दिल्ली,दि.२७ : देशातील शेती क्षेत्र, आपले गाव आणि शेतकरी यांना आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. हे जर आत्मनिर्भर झाले तरच आपल्या देशाचा पाया मजबूत होईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
मोदी यांनी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला.त्यावेळी ते बोलत होते. कोरोना काळात अनेकांनी सामाजिक बांधिलकी ठेवून मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे हा कठीण काळ जाण्यास मदत झाली आहे. यावेळी त्यांनी आदर्श शेती केलेल्या काही शेतकऱ्यांची उदाहरणे देशासमोर मांडली तसेच या कोरोनाच्या संकट काळामध्ये कौटुंबिक नाती अधिक घट्ट झाल्याचेही ते यावेळी म्हणाले. आजच्या काळात शेती करताना जितक्या आधुनिक पर्यायाचा आपण वापर करू शकाल, तितक्या चांगल्या पद्धतीने शेतीचा विकास होऊ शकेल, असेही ते म्हणाले. यात त्यांनी पुण्यातल्या वैशाली देशपांडे यांच्या नावाचा उल्लेख करत त्यांच्या प्रयत्नांच्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्या. येत्या 2 ऑक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान दिवंगत लालबहादूर
शास्त्री यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने हा मन की बात कार्यक्रम होत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
भारताला आत्मनिर्भर बनवण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे,असे त्यांनी सांगितले. कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही. त्यामुळे प्रत्येकाने मास्क वापरा व सुरक्षित अंतर ठेवा आणि प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करा,असे देखील आवाहन त्यांनी मन की बात या कार्यक्रमातून केले.