मुंबई : भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. भारताचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा अखेर ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. गेल्या शुक्रवारी रोहितची फिटनेस टेस्ट झाली होती, पण त्यावेळी रोहितला ऑस्ट्रेलियाला जाण्याची अनुमती देण्यात आली नव्हती.
रोहित शर्मा मंगळवारी ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाला असून त्याला १४ दिवस क्वाॅरंटाइनमध्ये राहावे लागेल. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार रोहित सकाळी रवाना झाला. तो क्वॉरंटाइनदरम्यान तंदुरुस्तीवर काम करेल. वैद्यकीय टीम त्याच्या तंदुरुस्तीची चाचणी घेईल आणि त्यानंतर त्याच्या खेळण्याचा निर्णय होईल. कर्णधार विराट कोहली पहिली कसोटी खेळल्यानंतर मायदेशी परतेल. त्यामुळे रोहित संघात दाखल होत असल्याने संघासाठी आनंदाची बातमी आहे.