सोलापूर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यातील मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 17 नोव्हेंबरपासून सुरु झाला आहे. यामुळे मतदार यादीतील नाव, पत्ता आदी दुरुस्ती करण्याची संधी मिळणार आहे. नागरिकांनी मतदार यादीत नाव असल्याची खात्री करावी. यासाठी येत्या शनिवार, रविवारी विशेष मोहीम आयोजित केली आहे. मतदार यादीत नाव नसल्यास नाव नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
एक जानेवारी 2021 अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्या मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. मतदार याद्यांमध्ये नावे नसलेले मतदार नाव नोंदणीसाठी विहित नमुन्यात अर्ज करु शकतील. याद्यांतील नावांबाबत आक्षेप असतील किंवा त्यामध्ये दुरुस्ती, सुधारणा करावयाच्या असल्यास दावे आणि हरकती 15 डिसेंबर 2020 पर्यंत मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्या अथवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार यांच्या कार्यालयात स्वीकारले जाणार आहेत.
दावे व हरकती निकाली काढण्याची मुदत 5 जानेवारी 2021 पर्यंत आहे. डाटाबेसचे अद्ययावतीकरण आणि पुरवणी याद्यांची छपाई 14 जानेवारी 2021 पर्यंत करुन 15 जानेवारी 2021 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. पूर्वीच्या मतदार यादीतील मरण पावलेल्या, स्थलांतरीत झालेल्या किंवा दुबार नोंदणी झालेल्या मतदारांची नावे वगळण्यात येणार आहेत. अशा वगळण्यात आलेल्या नावांची यादी जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयात ठेवण्यात येणार आहे.
सर्व राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्राकरीता त्यांच्या मतदान केंद्रस्तरीय अभिकर्त्याची (बूथ लेव्हल एजन्ट- बीएलए) नेमणूक करावी आणि शासनाच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बूथ लेव्हल ऑफीसर- बीएलओ) यांच्या मदतीने मतदार याद्या अधिक अचूक व परिपूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे. ऑनलाईन अर्ज नोंदणीची सुविधा http://www.nvsp.in या वेबपोर्टलवरही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.