ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मराठा आरक्षण- पुणे ते साष्ट पिंपळगाव दरम्यान मराठा संघर्ष यात्रा, ४ फेब्रुवारीपासून सुरुवात

पुणे : मराठा आरक्षणाबाबत सरकारची भुमिका दुटप्पी असून न्यायालयामध्ये त्याला स्थगिती मिळाली आहे. येत्या ५ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे. आरक्षणाचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी पुणे ते साष्ट पिंपळगाव असा मराठा संघर्ष यात्रा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी आयोजित पत्रकार परिषदेला मराठा क्रांती मोर्चा, पुणे जिल्ह्याचे राजेंद्र कुंजीर, रघुनाथ चित्रे पाटील, मीना जाधव, हनुमंत मोटे, नाना निवंगुणे, अनिल ताडगे, गणेश मापारी, जितेंद्र कोंढरे यांसह समन्वयक उपस्थित होते.

ही संघर्ष यात्रा दि. ४ फेब्रुवारी रोजी पुण्यातून निघणार असून ५ फेब्रुवारी रोजी जालना येथे पोहोचणार आहे. दि. ४ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता कोथरुड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे छत्रपतींना पुष्पहार अर्पण करुन वाहनांवरून यात्रेला सुरुवात होईल.

यात्रेच्या सुरुवातीला रथ असणार आहे. शिवाजीनगरमार्गे, येरवडा, नगर रोड, वाघोली, शिक्रापुर, राजंणगाव, शिरूर, सुपा, नगर, आमळनेर मार्गे बीड येथे मुक्काम करण्यात येणार आहे. शुक्रवार दि. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता बीड येथून पुन्हा सुरुवात होणार आहे. बीड ते पाडळसिंगी, गेवराई, शहागडमार्गे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यतील साष्ट पिंपळगाव येथील आंदोलनाला पाठिंबा दिला जाणार आहे. त्याठिकाणी मुंबई, मराठवाडा येथून ही मराठा समाजातील बांधव उपस्थित राहणार आहेत. त्याठिकाणी आंदोलनाची भूमिका ठरविण्यात येणार आहे.

आरक्षणासाठी २३ मार्च १९८२ साली स्व. आण्णासाहेब पाटील यांनी पहिले आत्मबलिदान दिले. तेव्हापासून सुरु असलेला आरक्षणाचा लढा मागील ३-४ वर्षात तीव्र झाला. आरक्षणाच्या या निकराच्या संघर्षात मराठा बांधवांनी सहभागी होणे आवश्यक आहे. जालना जिल्ह्यातील साष्ठ पिंपळगावातील मराठा बांधवांनी जो ठिया आंदोलनातून संघर्ष सुरु केला आहे, त्यांना पाठिंबा देवून या लढ्याला बळकटी देण्यासाठी या संघर्ष यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन समन्वयकांनी यावेळी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!