मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उपक्रमात रंगले “काव्यसंमेलन”,मसाप जुळे सोलापूर ; राज्य मराठी साहित्य संस्कृती मंडळाचा उपक्रम
सोलापूर दि.३० – साहित्य चळवळीतून ,कवी संमेलन, व्याख्यान आदी कार्यक्रमात मराठी भाषेच्या विचारांची देवाण घेवाण होते, त्यामुळे मराठी भाषेची समृध्दी वाढण्यास मदत होते.आणि साहित्य विषयक कार्यक्रमातून नवोदितांना मार्गदर्शन मिळते,असे प्रतिपादन प्रा. ए डी जोशी यांनी केले.
महाराष्ट्र राज्य मराठी साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई, आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा जुळे सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त जुळे सोलापुरातील इंडियन मॉडेल स्कूल येथे साहित्य महोत्सवाच्या समारोपात काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी प्रा.जोशी बोलत होते.अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी यांनी दोन्ही संस्थांच्या उपक्रमाची माहिती प्रास्ताविकातून दिली कार्याध्यक्षा सायली जोशी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती
यावेळी जेष्ठ कवी माधव पवार यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन झाले. आपली माझी कविता सादर करताना पवार म्हणाले……..
माझी कविता माझीच आहे.
कोणाकडूनही दत्तक
घेतलेली नाही.
म्हणूनच तिचे मडके कुठेही
खण खाणीत वाजते
बावनकशी सोन्याच्या
नाण्या सारखे.
…तर कवी मारुती कटकधोंड यांनी आपल्या कसे असावे शेजारी ही कविता म्हटली.
ह्दयात असावी ओल
आठवण निघावी माघारी
काळीज भरुन वाहणारी
शेजार व्हावे देवालय
माणसे माणसांना पुजणारी
कवियत्री वंदना कुलकर्णी यांनी मराठी दिनाचे औचित्य साधून………
माझ्या मराठीची माय
किती वर्णू ही महती
अमृताते पैजा जिंके
अशी आहे तिची कीर्ती.
अवीट अशी रसाळ
मधुर ज्ञानेषांची ओवी
संत साहित्याचा ठेवा
किती थोरवी ही गावी. ही कविता सादर केली.तर मंजिरी सरदेशमुख यांनी……
जगण्याच्या वाटेवरी
भाषा ती अबोध आहे
मौनात अबोल तरी
जीवन सुंदर आहे..
पांढरे निशाण
हातात घेऊन
जाहले जगून
आजवर…… ही रचना सादर केली.
कवी गोविंद काळे यांनी संसारात असलेली घुसमट आपल्या कवितेतून व्यक्त केली…
संसारासाठी —-
मला तेल होऊन तापवं लागतं
तेव्हा तुला जिरी मोहरी होऊन तडतडावं लागतं. तेव्हा कुठं संसाराला चव येते
हे तुलाही कळतंय धनी
तुम्ही नेहमीच म्हणता,
मला येडी ला काय कळतयं
तुम्हाला कळतय मला वळतयं
म्हणून तर आपलं सुत जुळतयं
तर….कवी गिरीश दुनाखे यांनी कोरोना काळातील वास्तव सादर केले.
कोरोनाची भीती,त्याचाच बागुलबुवा
आम्हा वाचव देवा आता आम्हा वाचव देवा || हळद दूध पिते रोज जात माणसाची,मनामध्ये आहे भीती तरीही कोरोनाची |सतत धवूनिया कारे हाती कंप यावा ||
प्रा. ए.डी.जोशी आणि डॉ.श्रुतिश्री वडगबाळकर यांनीही आपल्या दोन कविता सादर केल्या. हा कार्यक्रम करण्याच्या पार्श्वभूमीवर फेसबुक लाईव्ह करण्यात आला होता यावेळी कार्यवाह संदीप कुलकर्णी, हर्षा पटवारी,प्रांजली मोहिकर, योजनगंधा जोशी यांच्यासह , महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर चे पदाधिकारी आणि रसिक श्रोते उपस्थित होते.