मुंबई । उत्तरेकडील शीत लहरीमुळे राज्यात हाडे गोठविणारी थंडी पडली असतानाच, आता महाराष्ट्रातही गारठा वाढू लागला आहे. रविवारी राज्यात सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे ७.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात घसरलेल्या किमान तापमानामुळे येथील जिल्ह्यात गारठा वाढला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली, तर विदर्भात तुरळक ठिकाणी किंचित घट झाली. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले.
दरम्यान, मुंबईत रविवारी किमान तापमानाची नोंद २०.२ अंश सेल्सिअस एवढी झाली. सोमवारपासून मुंबईसह लगतच्या परिसरात किमान तापमानात आणखी घट नोंदविण्यात येईल. मुंबईत सोमवारी आणि मंगळवारी आकाश निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, २२ अंशांच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
विदर्भात येणार थंडीची लाट
२१ ते २४ डिसेंबर या कालावधीत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. परिणामी, राज्यात किमान तापमानाचा पारा आणखी खाली येण्याची शक्यता आहे. विशेषत: विदर्भातील काही ठिकाणी थंडीची लाट राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली.
शहरांचे किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
मुंबई २०.२
गोंदिया ७.४,
नागपूर ८.६,
वर्धा १०.२, परभणी १०.६,
जळगाव १२,
महाबळेश्वर १२.१,
नाशिक १२.२,
पुणे १२.२, औरंगाबाद १२.४,
अकोला १२.६,
चंद्रपूर १२.६,
अमरावती १२.७,
मालेगाव १३.२,
नांदेड १३.५,
बुलडाणा १३.८,
वाशिम १३.८,
सातारा १४.८,
सोलापूर १५.५,
सांगली १६.५,
कोल्हापूर १७.१,