पंढरपूर : कोरोनाच्या पार्श्वंभूमीवर शासनाने फेब्रुवारी अखेरपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. त्याअनुषंगाने मंदिर समितीने देखील माघी यात्रेत दि. 22 व दि.23 फेब्रुवारी रोजी विठ्ठल मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांनी पंढरपूरमध्ये येवू नये, याकरीता दोन दिवस संचारबंदी लागू करण्यात यावी, असा प्रस्ताव जिल्हा पोलिस विभागाकडून जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली. आषाढी यात्रा अनुषंगाने शुक्रवार दि. 5 फेब्रुवारी रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पंढरपूर येथे पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी त्या बोलत होत्या.
पुढे बोलताना तेजस्वी सातपुते म्हणाल्या की, दि. 23 फेब्रुवारी रोजी माघी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा येत आहे. मात्र, राज्यातील व सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाचे संकट हळूहळू कमी होऊ लागले असले तरी पुर्णत: संपलेले नाही. त्यामुळे राज्य शासनाने घालून दिलेल्या नियम व अटीनुसारच माघी यात्रा केवळ नाममात्र महाराज व मानकरी मंडळींच्या उपस्थितीत प्रतिकात्मक पध्दतीने साजरी करण्यात येणार आहे. मागील वर्षी ज्या प्रमाणे कार्तिकी, आषाढी यात्रा प्रतिकात्मक स्वरुपात साजरी करण्यात आली. त्याच पध्दतीने माघी यात्रा साजरी करावयाची आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने दि. 2 फेब्रुवारी रोजी विठ्ठल मंदिर दशमी व एकादशी दिवशी म्हणजेच दि. 22 व 23 रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने मंदिर बंदच राहणार आहे. त्यामुळे भाविकांनी दोन दिवस पंढरपूरला माघी यात्रेनिमित्ताने येवू नये. दि. 22 व 23 रोजी पंढरपूर येथे संचारबंदी लागू करण्याबाबत जिल्हा पोलिस विभागाकडून व जिल्हाधिकारी पाठविण्यात प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तर प्रांताधिकारी कार्यालयाकडूनही संचारबंदी लागू करण्यांबाबत जिल्हाधिकारी यांना कळविण्यात येत आहे. त्यानुसार आज किंवा उद्या निर्णय होईल, असेही तेजस्वी सातपुते सांगितले.
याप्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, पो.नि. अरुण पवार, पो.नि. किरण अवचर, पो.नि. प्रशांत भस्मे आदी उपस्थित होते.
त्रिस्तरीय नाकाबंदी
माघी यात्रेकरीता भाविक पंढरीत येवू नयेत म्हणून दि. 22 व 23 फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय व शहरस्तरीय अशी त्रिस्तरीय नाकाबंदी लावण्यात येणार आहे. याकरीता मागील आषाढी व कार्तिकी यात्रेप्रमाणेच पोलिस बंदोबस्तही असणार असल्याचे जिल्हा पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.