पुणे : ज्येष्ठ दांपत्याला मारहाण केल्याप्रकरणी कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना १८ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायाधीश एम.पी. परदेशी यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला.
याप्रकरणी अमन चढ्ढा (२८, रा. बापोडी, पुणे) यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता औंध येथील एका बँकेसमोर घडली. फिर्यादीचे आई-वडील सोमवारी संध्याकाळी सातच्या सुमारास दुचाकीवरून औंधवरून जात होते. त्या वेळी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या जाधव यांच्या कारचा दरवाजा अचानक उघडला आणि चढ्ढा दांपत्य दरवाजाच्या धक्क्याने खाली पडले. त्यानंतर जाधव यांनी दांपत्याला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. जाधव यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. जखमी दांपत्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. हा गुन्हा अजामीनपात्र आहे. या प्रकरणात ईशा बालाकांत झा यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.