ठाणे : ठाण्यातील अनेक वैशिष्ट्यांपैकी एक असलेल्या ‘मामलेदार मिसळ’चे सर्वेसर्वा लक्ष्मण मुर्डेश्वर यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या १५ दिवसांपासून मुर्डेश्वर आजारी होते. त्यांच्यावर उपचारही सुरू होते. मात्र, प्रकृती खालावत गेली आणि आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राचा मिसळसम्राट आणि ‘मामलेदार मिसळ’चा आधारवड हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
ठाणे शहराच्या ठळक वैशिष्ट्यांपैकी ‘मामलेदार मिसळ’ हे एक वैशिष्ट्य आहे. सामान्यांपासून ते राजकारणी व सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनाच झणझणीत आणि चमचमीत अशा ‘मामलेदार मिसळ’ने मोहात पाडले आहे. अर्थातच लक्ष्मण मुर्डेश्वर यांच्या अथक मेहनतीचेच हे फळ आहे. लक्ष्मण मुर्डेश्वर यांचे वडील नरसिंह मुर्डेश्वर यांनी १९४६ मध्ये तेव्हाच्या ठाणे मामलेदार कचेरीबाहेरची जागा व्यवसायासाठी शासनाकडून भाडेतत्वावर घेतली होती. तिथे त्यांनी कँटीन सुरू केले आणि अवघ्या सहा वर्षांनी म्हणजेच १९५२ मध्ये नरसिंह मुर्डेश्वर यांचे निधन झाले. त्यानंतर कँटीनची सारी जबाबदारी लक्ष्मण मुर्डेश्वर यांच्यावर पडली.