मुंबई | मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्या विरोधात दिल्लीत गेल्या दोन महिन्यांपासून अखंडपणे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत दाखल झाला आहे. शेतकऱ्यांच्या या मोर्चाबाबत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी खळबळजनक विधान केलं आहे.
“मुंबईतील शेतकऱ्यांचा मोर्चा हा फक्त पब्लिस्टिटी स्टंट आहे. किसान सभेने मुंबईत आंदोलन करण्याची काहीच गरज नाही”, असं मोठं विधान रामदास आठवले यांनी केलं आहे.
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्यासोबत आहे. कायदा सरकारने शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच केला आहे. मुंबईतील आंदोलन हा फक्त पब्लिसिटी स्टंट आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार आहे. पण मोदी काही शेतकरी विरोधी नाहीत. कायदा सरकारने केला आहे, मागे घेण्याचा प्रश्नच नाही. शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या ऐकून त्यानुसार काम देखील केलं गेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन थांबवायला हवं”, असं रामदास आठवले म्हणाले.
दरम्यान, नाशिकहून मुंबईत दाखल झालेल्या किसान सभेच्या मोर्चात तब्बल २० हजार शेतकरी सामील झाल्याची माहिती समोर आली आहे. या मोर्चात अखिल भारतीय किसान सभा, सीटू कामगार संघटना, अखिल भारतीय शेतमजूर युनियन, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, डीवायएफआय ही युवक संघटना व एसएफआय ही विद्यार्थी संघटना, शेतकरी, कामगार, शेतमजूर,सहभागी झाले आहेत.