मुंबई । कांजूरमार्ग मेट्रो कारशेडप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चपराक दिली आहे. कांजूर मेट्रो कारशेडचे काम ताबडतोब थांबवा, परिस्थिती जैसे थे ठेवा, असे आदेश उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला दिले आहेत. त्यामुळे राज्य सरकारला मोठा झटका बसला आहे.
दरम्यान, या निर्णयानंतर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर टीका केली आहे. कांजूरमार्ग मेट्रोशेडबाबतच्या कोर्टाच्या निर्णयाची बातमी ऐकली. त्यांना (विरोधकांना) जे करायचं ते त्यांनी केलं. आता कायद्याच्या माध्यमातून काय सकारात्मक भूमिका घेता येईल याबाबत सरकार भूमिका घेईल, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
अजित पवार पुढे म्हणाले की, कांजूरमार्ग मेट्रो कारशेडबाबत सर्व अधिकारी तसेच संबंधितांशी चर्चा करुन मुख्यमंत्र्यांसह एकत्र बसून पुढील भूमिका ठरवली जाईल. काम सुरु करण्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न केले जातील. कामं सुरु करण्यासाठी कुणी आडकाठी करु नये. विकासकामात आम्ही कधीच राजकारण करत नाहीत. आम्ही घेतलेला निर्णय केंद्र सरकारच्या फारच जिव्हारी लागलाय, असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलं आहे. आम्ही घेतलेला निर्णय काही लोकांच्या जिव्हारी लागला. म्हणून केंद्र सरकारने असा निर्णय घेतला, असा गंभीर आरोप अजित पवार यांनी केला आहे.