नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज सुदीप त्यागी याने सर्व प्रकारच क्रिकेटमधून निवृत्ती जाहिर केली आहे. पण सुदीपने निवृत्तीचा निर्णय का घेतला, याचे उत्तर काही जणांना मिळत नव्हते. त्यामुळे सुदीपच्या निवृत्तीमुळे चाहत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. पण सुदीपने आपल्या निवृत्तीबाबतचा खुलासा केला आहे.
जोपर्यंत भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत नाही तोपर्यंत खेळाडूला विदेशी लीगमध्ये खेळता येत नाही. त्यामुळे सुदीपने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. सुदीपला श्रीलंका प्रीमिअर लीगमध्ये खेळण्याची ऑफर आली आहे. आज श्रीलंका प्रीमिएर लीगचे उद्घाटन होणार आहे. त्यामुळे यापूर्वीच सुदीपने निवृत्तीचा निर्णय घेतल्याचे समजत आहे.
सुदीप त्यागी याने भारताकडून 4 एकदिवसीय व एक टी-20 सामना खेळला होता. श्रीलंकेविरुद्ध झालेल्या त्याच्या पदापर्णाच्या मालिकेत त्याने श्रीलंकेचा कर्णधार कुमार संगाकारा याचा बळी घेत थाटात पदार्पण साजरे केले होते. 2009 साली धोनीच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेविरुद्ध सुदीपने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
2010 साली त्याने भारतीय संघाकडून अखेरचा सामना खेळला. त्यानंतर त्याला भारतीय संघाकडून पुन्हा संधी मिळाली नाही. आयपीएल 2009 तसेच 2010 साली तो चेन्नई सुपर किंग्सकडून 14 सामने खेळला होता. सुदीपने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 41 सामने खेळताना 109 बळी घेतले. तर, 23 अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये 31 बळी मिळवले आहेत.