औरंगाबाद – अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 94 वे मराठी साहित्य संमेलन नाशिकला होणार आहे. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी पत्रकार परिषदेत अशी घोषणा केली. मार्च महिन्यात हे साहित्य संमेलन पार पडणार आहे. हे संमेलन मार्च महिन्याच्या अखेरीस होणार असून 24 जानेवारीला या संमेलनाच्या तारखांची घोषणा ही केली जाणार आहे. याच बैठकीत संमेलन अध्यक्ष कोण असेल याबाबतही चर्चा होणार आहे, अशी माहिती कौतिकराव ठाले-पाटील यांनी दिली.
९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे उस्मानाबादला पार पडले होते. रानकवी ना.धों. महानोर यांच्या हस्ते या साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले होते. तर ९३ व्या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे होते. 94 व्या साहित्य संमेलनासाठी नाशिक, सेलू, पुणे आणि अमळनेर येथून निमंत्रण आली होती.
यामध्ये पुण्याच्या सरहद संस्थेने फेर निमंत्रण पाठवत मे महिन्यात दिल्लीत संमेलन देण्याची मागणीही केली होती. साहित्य मंडळाने स्थळ निवडीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अंतिमतः नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचे निमंत्रण स्वीकारून 94 साहित्य संमेलनासाठी नाशिकची निवड केली. दिल्लीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेत, संसर्ग होण्याचा धोका पाहता. दिल्ली निमंत्रणास तूर्तास स्थगित केल आहे, अशी माहिती कौतिकराव ठाले-पाटील यांनी दिली.