रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हा,सोलापूरच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन
सोलापूर, दि.23: जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत (PMFBY) सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे.
पीक विमा योजनेसाठी 2020-21 या हंगामाच्या नोंदणीसाठी राष्ट्रीय पिकविमा संकेतस्थळ कार्यान्वित झालेले आहे. जिल्ह्यातील अधिसुचित क्षेत्रातील पिकासाठी पीक विमा क्षेत्र घटक धरुन राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पीक विमा राबविण्यासाठी सोलापूर जिल्ह्यासाठी भारती ॲक्सा जनरल इंन्शुरन्स कंपनी लि. मुंबई या विमा कंपनीची शासनाने नियुक्ती केली आहे.
-योजनेची वैशिष्ट्ये
ही योजना या आदेशान्वये अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसूचित पिकांसाठी असेल.प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे.अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकासाठी खातेदारांच्या व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत.नैसर्गिक आपत्ती/ कीड आणि रोगासारख्या अकल्पीत प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे.
-योजनेचे वेळापत्रक
कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यासांठी विमा प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत समान असेल. पीक विमा भरण्याची अंतिम मुदत पीकनिहाय पुढीलप्रमाणे- 30 नोव्हेंबर 2020 (रब्बी ज्वारी), , 15 डिसेंबर 2020- (गहू बा., हरभरा, कांदा, व इतर पिके), 31 मार्च 2021- (उन्हाळी भात उन्हाळी भूईमुग).
या हंगामात प्रति हेक्टरी गहू बा. या पिकासाठी शेतकरी हिस्सा रक्कम 465 रूपये असून विमा संरक्षित रक्कम 31000 रूपये, ज्वारी बा. शेतकरी हिस्सा 420 रूपये असून विमा संरक्षित रक्कम 28000 रूपये, ज्वारी जि. या पिकासाठी शेतकरी हिस्सा 330 रूपये असून विमा संरक्षीत रक्कम 22000 रूपये /-, हरभरा पिकासाठी शेतकरी हिस्सा 262.50 रूपये असून विमा संरक्षीत रक्कम 17500 रूपये आहे. उन्हाळी भुईमूग या पिकासाठी शेतकरी हिस्सा 450 रूपये असून विमा संरक्षीत रक्कम 30000 रूपये, रब्बी कांदा पिकासाठी हिस्सा 2750 रूपये असून विमा संरक्षीत रक्कम 55000 रूपये आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम 2020-21 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक व राष्ट्रीयकृत बँक तसेच जनसुविधा केंद्राद्वारे, शेतकरी स्वत : पिक विमा पोर्टलवर www.pmfby.gov.in ऑनलाईन अर्ज करु शकतात. प्रधानमंत्री पिक विमा येाजनेत शेतकऱ्यांचे अर्ज/ विमा हप्ता जनसुविधा केंद्रावर (csc) निशुल्क भरण्याची सुविधा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची तसेच चक्रीवादळ, वादळी पाऊस व अवेळी पाऊस यामुळे कापणीनंतर शेतात वाळविण्याकरीता ठेवलेल्या पिकांच्या नुकसान झाल्यास त्याबाबतची माहिती 72 तासांच्या आत संबंधित विमा कंपनी, कृषी विभाग यांना देणे आवश्यक आहे.
कर्जदार शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना ऐच्छिक आहे. यासाठी शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होण्याबाबत घोषणापत्र योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या 7 दिवस अगोदर बँकेला देणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास त्यांचा सहभाग बंधनकारक समजण्यात येईल.अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांना पीक विमा भरताना आधारकार्ड/ आधार नोंदणीची प्रत, 7/12 उतारा, भाडेपट्टी करारनामा, सहमती पत्र, पीक पेरणी स्वयं घोषणापत्र आणि पासबुकची प्रत सादर करुन इलेक्ट्रॉनिक साक्षांकन करणे बंधनकारक आहे. पीक विमा भरताना शेतकऱ्यांनी आपला बँकेचा खातेक्रमांक, पिकाखालील क्षेत्र, भूमापन क्रमांक इत्यादी खातरजमा करावे. जेणेकरुन भविष्यात पीक विमा मंजुर झाल्यानंतर तक्रारी उद्भवनार नाहीत, याची दक्षता घेण्याचे आवाहन श्री. माने केले आहे.