सोलापूर,दि.१७ : राजकारण फक्त निवडणुकीपुरते असावे. नंतर गावाचा विकास आपल्यालाच करायचा असतो, त्यामुळे जातपात, गटतट, पक्ष न मानता गावातील तरुणांनी एकत्र येऊन गावाच्या विकासासाठी लोकसहभाग देणे आवश्यक आहे, असे राज्याचे माजी सहकार, पणन मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांनी कारंबा (ता. उत्तर सोलापूर) येथे व्यक्त केले.
कारंबा येथे ग्रामपंचायतीच्यावतीने आयोजित विविध रस्ते, पेव्हर ब्लाॕक बसवणे तसेच घंटागाडीचे उदघाटन आणि तीनवर्षाच्या कार्यअहवालाचे प्रकाशन माजी मंत्री देशमुख यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार अध्यक्षस्थानी होते. श्रीगोंदा पंचायत समितीचे सदस्य सुरेश गोरे, लोकनियुक्त सरपंच सौ कौशल्या सुतार, वनपरिक्षेत्राधिकारी कल्याणराव साबळे, माजी सरपंच मल्लिनाथ तंबाके, माझा गाव, माझी माणसं फाउंडेशनचे प्रमुख विनायक सुतार, विश्वनाथ जगताप, भाजप तालुकाध्यक्ष काशिनाथ कदम, पाथरीचे उसरपंच श्रीमंत बंडगर, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष संभाजी दडे, योगेश गवळी, वनरक्षक अशोक फडतरे, भीमराव ठेंगील, ग्रामपंचायत सदस्य सौ. स्मिता पाटील, युन्नूस शेख, अशोक बहिर्जे, सौ. लक्ष्मी बहिर्जे, शिवसेना विभागप्रमुख संजय पौळ, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अप्पा गुंड, महेश पेंडपाले, भागवत कत्ते यावेळी उपस्थित होते
श्री. देशमुख म्हणाले, “आजच्या तरुणांचे स्वप्न, व्हिजन व्यापक आहे. त्यामुळे गावच्या विकासाचे स्वप्न तेच चांगल्या पद्धतीने पूर्ण करू शकतात, पण आजचे काही राजकारणी निष्ठेच्या नावाखाली कार्यकर्त्यांचा केवळ वापर करतात. जात-पात- गटतट आडवे आणून विकासाला खो देतात,
मला वाटतं कार्यकर्त्यांनी असे राजकारणी हेरुन त्यांना बाजुला केलं पाहिजे.” कारंबा गावाने केलेला विकास आदर्शवत आहे. यापुढेही गावाच्या विकास कामाला सर्वोतपरी साह्य करु, असेही ते म्हणाले.
श्री. पवार म्हणाले, “कारंब्याने परिपूर्ण विकास केला आहे. शासनाच्या प्रत्येक योजना गावाने राबवल्या आहेत. शिवाय अहवालाच्या माध्यमातून नेमकं काय केलं आणि कोणाला लाभ दिला, हेही त्यातून सांगितले आहे. यावरुन कामाची अंमलबजावणी आणि पारदर्शकता दिसून येते.” प्रास्ताविकात विनायक सुतार यांनी गेल्या तीन वर्षातील कामाचा आढावा घेतला. तसेच आगामी उद्दिष्ठांची माहिती दिली. यावेळी खेडचे उपसरपंच नागेश कोकरे, श्री. साबळे यांचीही भाषणे झाली. अभिनंदन गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.
——-
कारंब्याचे ब्रॕण्डिग करा
——-
गेल्यावर्षी आपण गावात महिला बचत गटासाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी टाय तयार करण्याचा उद्योग सुरु केला. पण लाॕकडाऊनमुळे अडचण झाली. पण यापुढेही टाय उत्पादन सुरु करा, गावाची ओळख टाय उत्पादन करणारा गाव म्हणून झाली पाहिजे, कारंब्याचे ब्ँण्डिग झाले पाहिजे, अशी अपेक्षाही श्री देशमुख यांनी व्यक्त केली.
—-
सरपंचांसाठी कार्यशाळा
—–
नुकत्याच जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूका पार पडल्या आहेत. त्यातील तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंचाचा यावेळी सत्कार करण्यात आला. लवकरच नवनिर्वाचित सरपंचांसाठी कार्यशाळा घेण्याचे नियोजन असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.