मुंबई : राज्यातील हवानात अचानक बदल झाला असून अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झाले आहे. आज (शुक्रवार) अचानक मुंबईत पावसाने हजेरी लावली. सकाळी 6 वाजल्यापासून मुंबईमध्ये पावसाने हजेरी लावली. सकाळी मुंबईच्या अनेक भागांत पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. दादर, माटुंगा आणि माहिम भागांत पावसाच्या सरी पाहायला मिळाल्या.
मुंबईप्रमाणेच पुण्यातील कोथरूड व कोकणातल्याही काही भागांत आज सकाळी (शुक्रवार) पावसाच्या सरी कोसळल्या. सकाळी साडे-पाच सहाच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळलेल्या पाहायला मिळाल्या. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं मुंबईत सध्या ढगाळ वातावरण आहे. हे वातावरण लवकरच निवळेल, असा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्रात मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता
उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव आणि बंगालच्या उपसागरातून येणारे वारे त्याचा प्रभाव म्हणून मध्य महाराष्ट्राच्या उत्तरेला जे क्षेत्र आहे तिथे मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे . दिनांक 11, 12 आणि 13 डिसेंबरच्या दरम्यान धुळे, जळगाव, नाशिक आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने अलर्ट जारी केलाय.