मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर अखेर सोमवारपासून राज्यातील नववी, दहावी आणि बारावीच्या शाळा सुरू झाल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव असतानादेखील शाळा सुरु करण्यात आल्या. पहिल्याच दिवशी राज्यातील काही जिल्ह्यांमधील सुमारे ३५ टक्के शाळा भरल्या. मात्र, त्यात विद्यार्थ्यांची उपस्थिती अवघी पाच टक्केच होती.
सोमवारी राज्यातील काही जिल्ह्यांमधील सुमारे ३५ टक्के शाळांमध्ये सुमारे दोन लाख ९९ हजार १९३ विद्यार्थांनी हजेरी लावली. शिक्षण विभागाकडून ३५ जिल्ह्यांच्या मिळालेल्या माहितीनुसार २५ हजार ८६६ शाळांपैकी नऊ हजार १२७ शाळा सुरु झाल्या. राज्यातील दोन लाख ७५ हजार ४७० शिक्षकांपैकी एक लाख ४१ हजार ७२० शिक्षकांची करोना चाचणी पूर्ण झाली आहे. तर यापैकी १३५३ शिचकांची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. तर ४४ हजार ३१३ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी २९० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चाचणी पॉझिटीव्ह आल्या आहेत. दरम्यान, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सर्व अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पहिल्या दिवसाचा आढावा घेतला. तसेच एक दिवस आड करून विद्यार्थी शााळेत उपस्थित राहणार आहेत. शाळेतील इतर विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वर्गही चालू राहणार आहेत अशी माहिती गायकवाड यांनी दिली.
या जिल्ह्यांतील शाळा बंद
मुंबई, पालघर, ठाणे, पुणे शहर, जळगाव, हिंगोली, धुळे, नांदेड, नाशिक, नागपूर, परभणी.
या जिल्ह्यातील शाळा सुरू
अमरावती, गडचिरोली, धाराशीव, सातारा, सोलापूर, अकोला, यवतमाळ, लातूर, जालना, संभाजीनगर, नंदुरबार, बुलढाणा, गोंदीया, चंद्रपूर, भंडारा, रत्नागिरी, सांगली, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, वाशीम, बीड, पुणे ग्रामीण, वर्धा