ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यामध्ये एक वर्षापूर्वी पहाटे ‘लव्ह जिहाद’ झाला, शिवसेनेची भाजपवर टीका

मुंबई : ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याची मागणी करणाऱ्या भाजपवर शिवसेनेनं ‘सामना’च्या आजच्या अग्रलेखातून टीकेची झोड उठवली आहे. ‘लव्ह जिहाद’च्या विषयावर बांग देऊन सरकारला हादरे देऊ, या भ्रमातूनही भाजपवाल्यांनी बाहेर पडावे. एक वर्षापूर्वी पहाटे ‘लव्ह जिहाद’ झाला. तरीही महाविकास आघाडीचे सरकार आले व टिकले. ते टिकणारच आहे!, अशा शब्दात शिवसेनेन भाजपवर टीका केली आहे.

राज्यात लव्ह जिहादवरून सध्या भाजपने आदळआपट सुरू केली आहे.  मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश सरकारनं या संदर्भात कायदे करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारनंही ‘लव्ह जिहाद’चा कायदा करावा, अशी मागणी केली आहे. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचं सरकार आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी हे सेक्युलर पक्ष म्हणून ओळखले जातात. ते अशा कायद्याला पाठिंबा देणार नाहीत हे माहीत असल्यानं शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजप ही मागणी करत असल्याचं बोललं जातंय.

‘भाजपला हिंदुत्वाचा घोर लागून राहिला आहे. लव्ह जिहाद हे त्यांचे नवीन हत्यार आहे. प. बंगाल निवडणुकांनंतर ते हत्यारही भंगारात जाईल. आता उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि हरयाणा या भाजपशासित राज्यांत लव्ह जिहादविरोधी कायदे करण्याच्या हालचाली सुरू आहेत. पण कायद्यापेक्षा या प्रश्नी बोंबलण्याचीच उकळ जास्त फुटली आहे,’ असा टोला शिवसेनेनं हाणला आहे. ‘भाजपच्या व्याख्येनुसार महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ची कधी व किती प्रकरणं घडली आहेत, ते समोर आणावं. उगाच नसलेली थडगी उकरून काढून राज्यातील सामाजिक सौहार्द बिघडविण्याचा प्रयत्न करू नये. लव्ह जिहाद हा विषय शिवरायांच्या महाराष्ट्रात रुजू शकत नाही. येथे शिवसेनेचा हिंदुत्ववाद कायम आहे. आमचे हिंदुत्व म्हणजे खोमेनी छाप धार्मिक उन्माद व त्यावर तरारलेले राजकारण नाही,’ असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!