मुंबई । बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. ती दररोज एकाहून जास्त ट्वीट करतेच. याच दरम्यान कंगनाने क्रिकेटपटू रोहित शर्मा विरोधात आक्षेपार्ह भाषेत ट्विट केलं होत. त्याप्रकरणी ट्विटरने कंगनावर कारवाई केली आहे. ट्विटरने तिच्या दोन पोस्ट डिलीट केल्या असून सामाजिक तेढ निर्माण होईल, असं ट्विट न करण्याची तंबीही ट्विटरने कंगनाला दिली आहे.
केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात सरकार व शेतकरी संघटना यांच्यात संघर्ष सुरू असताना हा संघर्ष बुधवारी तीव्र स्वरूपात सोशल मीडियावरही दिसून आला.आंतरराष्ट्रीय पातळीवरील काही नामवंतांनी शेतकरी आंदोलनास पाठिंबा दिला आहे. यानंतर भारतातील सेलिब्रिटी देखील व्यक्त झाल्याचं पाहायला मिळालं. क्रिकेटपटू रोहित शर्मा यानं देखील यासंदर्भात ट्विट केलं होतं. रोहितच्या ट्विटला उत्तर देताना अभिनेत्री कंगना रणौत हिनं त्याच्यावर टीका करताना आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्यानं नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
यानंतर ट्विटरन कंगनाच्या या ट्विटची दखल घेऊन त्यावर कारवाई केली आहे. ट्विटरने कंगनाच्या दोन्ही पोस्ट डिलीट केल्या आहेत. कंगनाने नियमांचा भंग केल्याचं कारण देत ही कारवाई करण्यात आली आहे. कंगनाने ज्या पद्धतीने भाषेचा वापर केला आहे. ती या प्लॅटफॉर्मसाठी योग्य नाही. आमच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या ट्विट्सवरच आम्ही कारवाई केली आहे, असं ट्विटरने म्हटलं आहे.
तत्पूर्वी, ‘जेव्हाही आपण एकत्र उभं राहिलो आहे, तेव्हा तेव्हा भारत आणखी ताकदवान झाला आहे. काही तरी पर्याय किंवा उपाय नक्कीच काढावा लागेल. आपल्या देशात शेतकरी महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. मला आशा आहे की, आपण सर्व एकत्र येऊन काही तरी उपाय नक्कीच काढू’, असं ट्विट रोहितनं केलं होतं.रोहितच्या या ट्विटला उत्तर देताना कंगनानं आक्षेपार्ह भाषेचा वापर केला. ‘क्रिकेटपटूंची अवस्था अशी का झाली आहे, ‘ना घर का ना घाट का’. शेतकरी अशा कायद्याविरुद्ध का जातील जो त्यांच्यासाठीच क्रांतिकारी ठरणार आहे. हे दहशदवादी आहेत, जे गोधंळ घालतायत. असं बोलायला भीती का वाटतेय?, अशा भाषेत कंगाननं रोहितला उत्तर दिलं होतं. त्यानंतर कंगनाच ते ट्विट डिलीट करण्यात आलं आहे.