पंढरपूर : श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीला भाविकांनी दान स्वरूपात दिलेल्या जमिनी राज्यातील 156 गावांमध्ये विखुरलेल्या आहेत. त्याचे एकूण क्षेत्र हेक्टर 942.04 आर. म्हणजेच 2355 एकर आहे. त्यापैकी 408.72 हेक्टर आर. म्हणजेच 1021 एकर जमीन ताब्यात घेण्यात आली आहे. त्यावर मंदिर समितीचे नाव दाखल केले आहे असून आणखी 1 हजार 334 एकर जमिनींचा शोध सुरू करण्यात आला आहे.
दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल- रुक्मिणीच्या दर्शनाकरीता दररोज लाखो भाविक येतात. दरवर्षी भरणार्याच मोठ्या 4 यात्रा, तसेच महिन्यांची व पंधरा दिवसांची एकादशी यास भाविक प्रामुख्याने हजेरी लावतात. या विठूरायावर नितांत श्रध्दा असलेल्या भाविकांनी विठ्ठलास जमिनी दान स्वरुपात दिलेल्या आहेत. या दान स्वरुपात दिलेल्या जमिनी मंदिर समितीने ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत 2355 एकरपैकी 1021 एकर जमिनी ताब्यात घेतल्या आहे. तर उर्वरित 1334 एकर जमिनींचा शोध घेतला जात आहे. तर 1021 एकरपैकी 102.16 आर.क्षेत्र शेतकर्यांमना लिलाव पध्दतीने शेतकर्यांयना भाडेपट्ट्याने दिले आहे. यातून वर्षाकाठी मंदिर समितीला 11 लाख 56 हजार रुपये उत्पन्न मिळत आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये 113 एकर जमिनीवर नाव दाखल करण्यात आले आहे. उर्वरित जमिनीवर नाव दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ताब्यात घेतलेल्या जमिनीपैकी हेक्टर 102.16 आर इतके क्षेत्र शेतकर्यांयना लिलाव पध्दतीने 11 महिन्यांसाठी खंडाने देण्यात येत आहेत. त्यामध्ये यावर्षी 11.56 लाख इतके उत्पन्न मिळाले आहे.
मंदिर समितीने ताब्यात घेतलेल्या जमिनींबाबत 64 प्रकरणे न्यायालयात सुरू होती. त्यामध्ये 8 निकाल मंदिर समितीच्या बाजूने निकाल लागले आहेत. तर उर्वरित 56 न्यायालयीन प्रकरणांसाठी स्वतंत्र विधिज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे. जमिनीच्या खंडातून मिळत असलेले उत्पन्न मंदिर समितीच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्त्रोत बनला आहे. या जमिनी ताब्यात घेण्यासाठी मंदिर समितीच्यावतीने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच जमिनीच्या सर्व रेकॉर्डचे स्कॅनिंग करण्याचे काम सुरू आहे.
77 हजार भाविकांचे दर्शन…
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर 16 नोव्हेंबर 2020 रोजी भाविकांना मुखदर्शनाकरीता खुले झाल्यापासून आतापर्यंत 1,56,000 भाविकांनी श्रींच्या मुखदर्शनाचा लाभ घेतला आहे. तसेच ऑनलाईन बुकींगची अट रद्द केल्यापासून 77,000 भाविकांनी दर्शन घेतले आहे. यामुळे मंदिर सुरू झाल्यापासून आतापर्यंत 1 कोटी 81 लाख रुपये इतके उत्पन्न मंदिर समितीस प्राप्त झाले आहे.
विठ्ठलास दान केलेल्या जमिनी असलेले जिल्हे
विठ्ठलास दान केलेल्या जमिनी या प्रामुख्याने पुणे विभागामध्ये सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तसेच अमरावती, बुलढाणा, नागपूर, यवतमाळ, अकोला, नगर जिल्ह्यामध्ये आहेत. या जमिनींचा शोध घेण्यासाठी स्वतंत्ररित्या मालमत्ता अधिकारी व त्यांना 2 मदतनीस कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत.