आज आदरणीय पवार साहेब ८०व्या वर्षात पदार्पण करत आहेत. अर्थात वयाच्या ८०व्या वर्षी त्यांचा उत्साह मात्र अगदी चाळीस वर्षाच्या व्यक्तीचा आहे हे वास्तव आहे. पवारसाहेबांच्या सोबत मला गेली जवळपास तीसहून अधिक वर्ष जवळून सहवास लाभला हे माझे भाग्यच आहे. पवारसाहेबांच्या सोबत घालवलेली वर्ष ही अक्षरशः मंतरलेली वर्ष होती, असं म्हणता येईल. या सर्व काळात पवार साहेबांकडून मी खूप काही शिकलो. माझ्या राजकीय व सामाजिक आयुष्यातील अनेक गोष्टी साहेबांनी मला शिकवल्या आहेत.
आदरणीय पवार साहेबांच्या विषयी जितके लिहावे तितके कमी वाटते कारण साहेबांचे व्यक्तिमत्व समुद्रासारखे आहे. लोक अनेकदा पवार साहेबांना हिमालयाची उपमा देतात पण मला पवार साहेबांचे व्यक्तिमत्व कायम समुद्रासारखे वाटत आले आहे. अथांग असा समुद्र कायम जे काही येईल ते आपल्यात सामावून घेत असतो, आपलेसे करत असतो, तसे आजूबाजूला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला, प्रसंगाला आपल्यासारखे करण्याची किमया साहेबांना साध्य झाली आहे.
या जगात अशी खूप कमी माणसं असताना ज्यांना जीवनात आपल्याला समाजाच्या उपयोगी पडायचे आहे याची जाणीव असते, पवार साहेब हे त्यापैकी एक आहेत. म्हणूनच पवार साहेबांनी स्वतःच्या जीवनात त्यांचे विचार आणि कृती याद्वारे समाजाच्या समोर कायम आदर्श घालून दिला. त्यांच्या विचार आणि कृतीत कधीच तफावत आढळली नाही. अशा अनेक गोष्टींत पवारसाहेबांचे मोठेपण सामावले आहे.
पवार साहेबांच्या आयुष्याकडे जेव्हा आम्ही पाहतो त्यावेळी आम्ही विचार करतो की ८० वर्षाच्या आयुष्यात किमान ८०० तरी महत्वाची आयुष्यं ते जगले असतील. इतके त्यांचे आयुष्य समृद्ध आहे, इतक्या वेगवेगळ्या पातळ्यांवर त्यांनी काम केलं आहे. गावच्या ग्रामपंचायतीच्या पासून ते जागतिक क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदापर्यंत सर्व निवडणुका त्यांनी हाताळल्या आहेत आणि ग्रामपंचातीच्या सरपंचापासून ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षापर्यंत त्यांचा तितकाच सहज व सुलभ संवाद आहे.
पवार साहेबांना जगातील कोणताही विषय वर्ज्य नाही. त्यांच्या कानावर एखादा नवीन शब्द पडला तर अगदी लगेच ते तो विषय नक्की काय आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करतात. त्या विषयातले तज्ञ लोक कोण आहेत, त्यांना ते सन्मानाने बोलवून घेतात आणि त्यांच्याशी गप्पा मारून तो विषय समजून घेतात. मागील वर्षी पवार साहेबांनी भीमा कोरेगाव दंगलींच्या संदर्भात काही भूमिका घेतली, पण लोकांना माहिती नसलेली गोष्ट ही की त्याआधी कित्येक महिने पवारसाहेब हा विषय सविस्तर समजून घेत होते. इतका सविस्तर की त्या विषयाशी संबंधित उपलब्ध सर्व कागदपत्र अगदी त्या विषयावर विधानसभेत झालेल्या चर्चेपासून ते त्यावर छापून आलेल्या प्रत्येक लेखापर्यंत आणि त्या विषयाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीशी त्यांनी सविस्तर चर्चा केली होती आणि मगच त्यावर सविस्तर भाष्य केले. अर्थात, हे केवळ भीमा कोरेगाव दंगलींच्या बद्दल नाही, तर ज्या ज्या विषयावर पवार साहेब काही ठोस भूमिका घेतात त्या प्रत्येक विषयाच्या बाबत पवार साहेब असाच अभ्यास करत असतात हे आम्ही गेली तीस वर्ष डोळ्यांनी पाहत आहोत.
पवार साहेबांइतकी माणसांची पारख असणारा व्यक्ती माझ्या पाहण्यात तरी दुसरा नाही. एखाद्या व्यक्तीसोबत अगदी तीस सेकंद ते एक मिनिटाच्या संवादात देखील पवार साहेब त्या व्यक्तीचा वकूब ओळखू शकतात, इतकी त्यांना माणसांची पारख आहे. कोणत्या व्यक्तीला कुठे बसवलं तर तो व्यक्ती ती जबाबदारी उत्तम पद्धतीने पार पाडू शकतो याची पूर्ण कल्पना त्यांना असते. म्हणूनच विविध संस्थांच्या ठिकाणी पवार साहेबांनी निवडलेली अनेक लोकं गेली कित्येक वर्षे उत्तम पद्धतीने काम करताना आपल्याला दिसतात. त्याहूनही विशेष म्हणजे एकदा एखादी जबाबदारी टाकली की पुन्हा साहेब त्या व्यक्तीच्या कामात अजिबात हस्तक्षेप करत नाहीत. त्या व्यक्तीला कामाचे आणि निर्णयाचे पूर्ण स्वातंत्र्य देतात. महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनाचे पवार साहेबांवर खूप प्रेम आहे, याचं कारण प्रशासनाला योग्य तो सन्मान देऊन साहेबांनी प्रशासन उत्तम पद्धतीने हाताळले आहेत. त्यांच्या मतांचा योग्य तो आदर राखून निर्णय घेतले आहेत. अशा कितीतरी गोष्टी लिहिता येतील.
माझ्या मते माननीय शरद पवार नावाची केवळ एक व्यक्ती नसून तो एक विचार आहे, एक विद्यापीठ आहे!
आदरणीय शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा !
-श्री. जयंत राजाराम पाटील,
प्रदेशाध्यक्ष व विधिमंडळ पक्षनेता, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र राज्य.
मंत्री, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, महाराष्ट्र शासन
Sharad Pawar #SharadPawar Nationalist Congress Party – NCP