ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित; विद्यापीठ परीक्षा वेळापत्रकानुसार होणार

 

सोलापूर, दि.1- सातवा वेतन आयोग तात्काळ लागू करण्यात यावा, यासह प्रमुख मागण्यांसाठी राज्यातील विद्यापीठ कर्मचारी संघटनेच्यावतीने लेखणी बंद आंदोलन सुरू करण्यात आले होते. सदरील आंदोलन गुरुवारी स्थगित झाल्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा या वेळापत्रकानुसार सुरळीतपणे सुरू होतील, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक सीए श्रेणिक शहा यांनी दिली.

परीक्षेसंदर्भात माहिती देताना सीए शहा म्हणाले की, विद्यापीठ अनुदान आयोग, राज्यपाल कार्यालय आणि राज्य शासनाचे उच्च शिक्षण विभाग यांच्या सूचनेनुसार कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेचे नियोजन करण्यात आलेले आहे. 5 ते 28 ऑक्टोबर 2020 या कालावधीत ऑनलाइन/ ऑफलाइन पद्धतीने परीक्षा होणार आहेत. पारंपरिक आणि व्यावसायिक अशा दोन विभागात या परीक्षा होणार आहेत, त्यानुसार विद्यापीठाकडून परीक्षेचे नियोजन करण्यात आलेले आहे.

विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघटनेकडून आपल्या मागण्यांसाठी लेखणी बंद आंदोलन पुकारण्यात आले होते. राज्यातील विद्यापीठ कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींची राज्यकर्त्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याने सदरील आंदोलन स्थगित झाले आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या अंतिम वर्ष, एटीकेटी, बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षा या वेळापत्रकानुसार सुरळीतपणे सुरू होतील, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक सीए श्रेणिक शहा यांनी दिली. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी वेळापत्रकानुसार आपली परीक्षा द्यावी, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!