सोलापूर- अशिक्षित व आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या बुरुड समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढले तरच त्या समाजाची प्रगती होणे शक्य होणार आहे व शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे. तो डोळा उघडल्यानंतरच प्रत्येकाला स्वतःबरोबर कुटुंब व समाजाचे चांगले भवितव्य दिसणार आहे,असे ठाम प्रतिपादन राष्ट्रीय बुरुड समाजाच्या कार्यकारी सदस्य सौ.माधुरीताई होणगेकर(कारवार) यांनी केले.
सोलापूर शहर बुरुड समाज संघटनेच्यावतीने समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या गरजू मुलींना शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली,त्यावेळी होणगेकर बोलत होत्या,संघटनेचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार श्री.दशरथ वडतीले हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उस्मानाबाद जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीच्या मुख्यसेविका सौ.स्नेहाताई गोणे, संघटनेचे उपाध्यक्ष श्री.चंदन वडतीले, उस्मानाबाद जिल्हा बुरुड समाजाचे अध्यक्ष श्री. शिवाजीराव गोणे,श्री.विनोद रोहिटे,माजी अध्यक्ष श्री.रमेश शेंद्रे,श्री.महेश होणगेकर व श्री.किरण गोणे आदी होते.
प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते दिपप्रजवलन करण्यात आले,संघटनेचे अध्यक्ष दशरथ वडतीले यांनी प्रास्ताविक केले,खजिनदार नितीन रोहिटे यांनी परिचय करुन दिला,त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते वैष्णवी जनार्दन वडतीले,संजना चंद्रकांत रोहिटे,भाग्यश्री अरविंद वडतीले व श्रुतिका राजू वडतीले यांना शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली व श्री.लक्ष्मण रघुनाथ साळुंके यांना कॅन्सरच्या उपचारासाठी मदत देण्यात आली. याप्रसंगी स्नेहाताई गोणे,विनोद रोहिटे,वैष्णवी वडतीले व संजना रोहिटे यांनी मनोगत व्यक्त केले.सोलापूर जनता बँकेत अधिकारी म्हणून बढती मिळल्याबद्दल सौ.संगीता वडतीले व देणगीदार विनोद रोहिटे यांचा सत्कार करण्यात आला.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे उपाध्यक्ष श्री.सूर्यकांत शेंद्रे सर यांनी केले तर कार्याध्यक्ष श्री.विठ्ठल साळुंके यांनी खास शैलीत आभार मानले.महिलांच्या दीपोत्सवाने कार्यक्रमाची सांगता झाली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंडित वडतीले, नितीन रोहिटे,अरुण साळुंके मारुती साळुंके, रविराज वडतीले, अक्षय वडतीले व समर्थ साळुंके यांनी विशेष परिश्रम घेतले.