ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शिवसेनेचे आ.प्रताप सरनाईकांच्या घरावर ईडीची छापेमारी ; किरीट सोमय्या म्हणतात….

मुंबई : सक्तवसुली संचालनालयानं शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर छापे टाकताच भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांच्यावर हल्ला चढवला आहे. ‘शिवसेनेचे मोठे मोठे नेते आणि त्यांचे मुखिया व त्यांचा परिवार असेच उद्योगधंदे करतात हे सर्वांना माहीत आहे,’ असा थेट आरोप सोमय्या यांनी केला आहे.

‘प्रताप सरनाईक यांच्या कुटुंबाच्या अनेक कंपन्या आहेत. त्या कंपन्या बेनामी असतील. त्यांचा कारभार व्यवस्थित नसेल. सरकारी पैसा किंवा भ्रष्टाचाराचा पैसा त्यांनी वळवला असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी. सरनाईक यांच्याबद्दल मी अशा प्रकारच्या अनेक गोष्टी ऐकल्या होत्या,’ असा दावाही सोमय्या यांनी केला. शिवसेनेचे मुंबई, ठाण्यातील अनेक नेते महापालिकेच्या कंत्राटदारांकडून हफ्ते घेतात. त्यांच्यावर कारवाई व्हायला नको का?,’ असा प्रश्नही त्यांनी केला. सोमय्या एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

प्रताप सरनाईक हे शिवसेनेचे ओवळा-माजिवडा मतदारसंघाचे आमदार आहेत. मुंबई व ठाण्यातील त्यांचे घर व कार्यालय अशा दहा ठिकाणी धाडी घालण्यात आल्या आहेत. सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक व पूर्वेश सरनाईक यांच्याही घराची झाडाझडती सुरू आहे. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!