ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शेटफळ शिवारात आढळले बिबट्याच्या पावलांचे ठसे ; परिसरात भीतीचे वातावरण

चिखलठाण (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील अनेक गावांमध्ये नरभक्षक बिबट्याची दहशत पसरली आहे. या बिबट्याला टिपण्यासाठी मिशन राबवण्यात आलं. शूटरने गोळीबारही केला मात्र बिबट्या निसटून जाण्यात यशस्वी ठरला. दरम्यान, शेटफळ  शिवारात आज (ता. 12) सकाळी आठ वाजता पुन्हा बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले आहे.

 

यामुळे परिसरात पुन्हा भीतीचे वातावरण तयार झाले आहे. याची माहिती मिळताच घटनास्थळी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी भेट देऊन हे ठसे पाहिले. हे ठसे बिबट्याचे असले तरी ते तीन-चार दिवसांपूर्वीचे असावेत, असा अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

 

सकाळी आठ वाजता धोंडीराम मासाळ यांना शेटफळ येथील अंबादास लबडे यांच्या शेतात बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले. शेजारी शेत असणाऱ्या अतुल रोंगे यांनी याची माहिती वन विभागाला दिली. परिसरात बिबट्याच्या हल्याच्या पाच दिवसांनंतरही त्याची दहशत कायम असून, वन विभागाच्या वतीने ठोस पावले उचलण्याची मागणी लोकांमधून केली जात आहे.  तीन-चार दिवसांपूर्वी बिबट्याचा वावर याच परिसरात होता. सध्या तो या ठिकाणी असण्याची शक्‍यता कमी असली तरी लोकांनी पूर्ण खबरदारी घ्यावी, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे. वन विभागाची यंत्रणा या परिसरातही शोध घेत आहे.

 

बालिकेवर हल्ल्याच्या घटनेनंतर वनविभागाच्या तावडीतून बिबट्या निसटला होता. फार मोठी यंत्रणा तैनात असतानाही व आधुनिक तंत्राचा वापर करूनही बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करण्याचा विश्वास व्यक्त करणाऱ्या वन विभागाच्या आश्वासनानंतर पाच दिवस होऊनही बिबट्याला पकडण्यात किंवा ठार मारण्यात यश मिळाले नाही. उलट मोठ्या प्रमाणावर भीतिदायक वातावरण निर्माण झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!