ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ; महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण आहे. पावसाळी वातावरणामुळे राज्यातील थंडी अचानक गायब झाली आहे. गेल्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला आहे. दरम्यान, मुंबई आणि पुण्यासह कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

जानेवारीच्या सुरुवातीपासून राज्यात थंडीच्या वाटेत कमी दाबाच्या क्षेत्रांचे आणि समुद्रातून येणाऱ्या बाष्पाचे अडथळे आले. दक्षिण मध्य अरबी समुद्रापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात पावसाळी वातावरण तयार आहे.

त्यामुळेच उत्तर भारतात थंडीची तीव्र लाट असतानाही राज्यातील रात्रीचे तापमान सरासरीखाली येऊ शकले नाही. कोकण ते उत्तर-मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. समुद्रातून बाष्प येत असल्याने थंडी पूर्णपणे गायब होऊन किमान तापमानात वाढ झाली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात 9 जानेवारीपर्यंत पावसाळी वातावरण राहणार आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात 8 जानेवारीपर्यंत पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. तसेच, 7 जानेवारीला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात हलक्या सरींच्या पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!