सोलापूर : जिल्ह्यातील नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रातील हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या कृती आराखड्याबाबत सद्यस्थितीची माहिती सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या.
सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागांच्या विविध समित्यांच्या आढावा बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. यावेळी सहायक आयुक्त कैलास आढे यांच्यासह संबंधित कार्यालयांचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या आर्थिक, सामाजिक पुनर्वसनासाठी विविध योजनांचा लाभ मिळवून देणे, त्यांना या कामातून कार्यमुक्त करणे, अपराधाची नोंदणी झालेली प्रकरणे आणि केलेल्या कार्यवाहीबाबत माहिती घेऊन जनजागृती करणे, नोंदणीकृत सफाई कामगारांचे पुनर्वसन करणे, मृत्यू झाल्यास कुटुंबियांना 10 लाख रूपयांची मदत करणे याबाबत बैठकीत चर्चा झाली.
यावेळी प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना जिल्हास्तरीय समितीचा आढावा घेण्यात आला. योजनेसाठी निवड झालेल्या दुधनी, किरनळ्ळी (ता. अक्कलकोट), पिंपळगाव (ता. बार्शी) या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा, मल:निस्सारण, शिक्षण, आरोग्य, पोषण आहार, सामाजिक संरक्षण, रस्ते, गृहनिर्माण, वीज पुरवठा, गॅस जोडणी, कृषीविषयक योजना, वित्तीय पुरवठा सोयी-सुविधा, संगणकीकरण सुविधा, रोजगार निर्मिती व कौशल्य विकास सुविधाबाबत माहिती देण्यात आली. या गावात गाव विकास आराखडा व कुटुंबनिहाय सर्व्हेक्षण करून पीएमएजीवाय पोर्टलवर माहिती भरून अंतरिम गाव विकास आराखडा तयार केला आहे. केंद्र शासनाच्या निधीची कमतरता भासल्यास निधी उपलब्ध करुन देण्याच्या कामास प्राधान्य देऊन आदर्श गावात इतर विभागाच्या योजनाही राबविण्याच्या सूचना श्री. शंभरकर यांनी दिल्या.
रमाई आवास योजनेंतर्गत नगरपालिका क्षेत्रात मंजुरी दिलेल्या 4603 घरकुले पूर्ण करण्याची कार्यवाही करावी. ज्यांनी अद्याप बांधकाम सुरू केले नाही, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा, पात्र लाभार्थ्यांची यादी मंजुरीसाठी सादर करा. जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती घटक योजनेंतर्गत सर्व यंत्रणांनी 100 टक्के निधी खर्च होण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत. नाविन्यपूर्ण योजनेसाठी 2021-22 साठी प्रारूप मागणी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही श्री. शंभरकर यांनी दिल्या.