समाजमाध्यमातील प्रगत तंत्रज्ञानाने मराठीला बळ : डॉ. आशुतोष जावडेकर, सोलापूर आकाशवाणी आणि हि.ने.वाचनालयाच्यावतीने कार्यक्रम
सोलापूर, दि.२५ : फेसबुकीय मराठी आणि इतर समाजमाध्यमांतील प्रगत तंत्रज्ञानामुळे मराठीसह सर्व प्रादेशिक भाषांना बळ मिळालं , अशी भावना प्रसिद्ध लेखक, वक्ते डॉ. आशुतोष जावडेकर यांनी व्यक्त केली.
हिराचंद नेमचंद वाचनालय आणि आकाशवाणी सोलापूर यांच्यावतीने आयोजित ‘समाजमाध्यमांतील मराठी’ या विषयावरील व्याख्यानात त्यांनी हे निरीक्षण नोंदवलं. तरुणाईच्या आवडीचा हा विषय स्लाइड्सच्या माध्यमातून खुलवत नेत डॉ. जावडेकर यांनी व्याख्यान संपेपर्यंत श्रोत्यांना खिळवून ठेवलं.
आपल्या भाषणात डॉ. आशुतोष जावडेकर यांनी सुरुवातीला समाजमाध्यमांची आणि त्यांच्या वैशिष्ट्यपूर्णतेची रंजक शैलीत ओळख करून दिली. समाजमाध्यमांतील मराठी भाषेबद्दल बोलताना त्यांनी स्पष्ट केले की तंत्रज्ञान विकसित होईपर्यंत रोमनलिपीचा वापर करून लोक मराठीतच लिहित होते. मराठीचा अवलंब त्यांनी सोडला नाही. तंत्रज्ञान विकसित झाल्यानंतर मराठी आणि इतर प्रादेशिक भाषांतील की बोर्ड आले आणि मग तर मराठी लेखनाला बहर आला.
फेसबुक, ट्विटर, व्हाट्स्अॅ प, ब्लॅग, इन्स्टाग्राम या समाजमाध्यमांतील लेखन करताना शब्दमर्यादा, संकेत, भावनांचे प्रकटीकरण असे सर्वांगीण भान ठेवावे लागते. इथे संपादक नसल्याने सर्व स्तरांतील चौफेर आणि मोकळी, स्पष्ट, शैलीदार अभिव्यक्ती वाचायला मिळते. अनेक नवे लेखक-लेखिका त्यामुळे तयार झाले आहेत, असे सांगून डॉ. जावडेकर म्हणाले, आता तर यापुढे इमोजीची नवी शब्दरहित भाषा संकल्पना देखील चांगलीच प्रचलित झाली आहे.
समाजमाध्यम हीच नवी भाषा रूढ होऊ पाहत आहे.
प्रारंभी वाचनालयाचे प्रमुख कार्यवाह डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी मनोगत व्यक्त केलं. आकाशवाणी चे सहायक संचालक सुनील शिनखेडे यांनी प्रास्ताविक भाषणात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यात या विषयावरील व्याख्यान आयोजिण्यामागची भूमिका स्पष्ट केली. मंचावर त्यांच्यासह आकाशवाणीच्या सहायक अभियंता अर्चिता ढेरे, कार्यक्रम अधिकारी राजेंद्र दासरी, वाचनालयाचे कार्यवाह दत्ता गायकवाड उपस्थित होते. मंजुषा गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केलं. कोविडचे नियम पाळून या व्याख्यानाला शंभरहून अधिक रसिक उपस्थित होते. रसिकांच्या आग्रहावरून कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. आशुतोष जावडेकर यांनी संत तुकोबांचा अभंग गायिला.