ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सर्वसामन्यांसाठी मुंबई लोकल होणार खुली? येत्या आठवड्यात निर्णय

मुंबई: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन बंद आहे. सरकार अनलॉकच्या माध्यमातून लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच आता लोकलअभावी सुरू असलेल्या सर्वसामान्यांच्या प्रवासयातना आता लवकरच संपणार आहेत. कारण करोनाबाधितांच्या संख्येत होणारी घट लक्षात घेता, प्रशासनाने मुंबईत लोकल सर्वांसाठी खुली करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या आठवड्यात होणाऱ्या महत्त्वपूर्ण बैठकीत लोकलमुभेची तारीख निश्चित होईल. यानंतर स्वस्त आणि आरामदायी प्रवासासाठी सर्वांना मुंबई लोकलचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

 

मार्च मध्ये लॉकडाउन सुरु झाल्यापासून मुंबईची जीवन वाहिनी समजली जाणारी लोकल सर्वसामान्य मुंबईकरांसाठी बंद आहे. बस आणि इतर मार्गाने प्रवास करत असलेले मुंबईकर त्रासलेले आहेत. त्यामुळे लोकल सर्वांसाठी खुली करण्याची मागणी सर्वांकडून केली जात आहे. अशातच लोकलमुभा देण्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहचली आहे. येत्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीत राज्य, महापालिका, रेल्वे अधिकारी असणार आहेत. १५ डिसेंबरनंतर सर्वांना लोकलमुभा देण्याची तयारी प्रशासनाने केली असून, या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

 

सर्वांना लोकलमुभेनंतर मास्क वापरणे बंधनकारक असेल. सुरक्षित वावरसह अन्य नियम मोडणाऱ्या व्यक्तींकडून मोठ्या दंडाची रक्कम वसूल करण्यात येईल, असे महापालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सुट्टीनिमित्त बाहेरगावी गेलेले मुंबईकर आता परतू लागले आहेत. परिणामी सध्या नियंत्रणात असलेला करोना पुन्हा वाढू नये. यासाठी प्रशासनाकडून दक्षता घेण्यात येत आहे. आगामी आठवड्याच्या शेवटी अर्थात ११-१२ डिसेंबरला बैठक आयोजित करण्यात आली आहे. यात करोना स्थितीचा आढावा घेऊन लोकल प्रवासाबाबत निर्णय घेण्यात येईल, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!