सोलापूर,दि.२४ : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तथा बेळगावचे खासदार सुरेश अंगडी यांचे दिल्ली येथे निधन झाले. त्यांच्या जाण्याने सोलापूर विषयी आत्मियता असणारे व्यक्तिमत्व गेले आहे. सोलापूर रेल्वेच्या विकासात त्यांच्या योगदानाने मोठी भर पडणार होती. परंतु काळाने घाला घातल्याने सोलापूर जिल्ह्यासह देशाने सहृदयी व तळागाळातील प्रश्नांना न्याय देणारे व्यक्तिमत्व गमावल्याची भावना खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामींनी व्यक्त केली आहे.
नवी दिल्ली येथील एम्स हॉस्पिटलमध्ये कोरोना उपचारादरम्यान केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे देहावसान झाले. बेळगावचे सलग चार वेळा संसद प्रतिनिधी म्हणून त्यांनी नेतृत्व केले आहे. मनमिळावू व कायम सकारात्मक विचार करणारे होते. सामान्य माणसांच्या प्रश्नांची जाण असणारे त्यांची सोडवणूक करणारे मोठ्या मनाचे नेतृत्व म्हणून त्यांची ख्याती होती.
रेल्वे राज्यमंत्री पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर सोलापूर मध्य रेल्वेच्या संदर्भात त्यांनी संपूर्ण आढावा घेतला. दुहेरीकरण, डीआरएम कार्यालयाच्या संदर्भात अनेक वेळा त्यांनी आग्रहाने भूमिका सोलापूरला प्राथमिकता दिली. नुकत्याच सोलापूर ते नेलमंगला दरम्यान सुरु झालेल्या रो-रो रेल्वे सेवेच्या कामास त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच सोलापूरच्या विकासाशी संबंधित कामांमध्ये यश प्राप्त झाले . भविष्यात त्यांच्या उपस्थितीची फार गरज होती. व्यक्तिगत स्तरावर होता. त्यांच्या आकस्मित जाण्याने सोलापूरचे व लाखो जनसामान्यांचे आधारस्तंभ गेल्याची भावना खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामींनी व्यक्त केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो ही भावना व्यक्त करत शोक व्यक्त केला.