सोलापूर, दि. २८ : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेमडेसिव्हिर, टॉसिलिझुमॅब इंजेक्शन आणि औषधांचा पुरवठा मागणीच्या प्रमाणात कमी प्राप्त होत आहे. मात्र सोलापुरात कोरोना रुग्णांसाठी औषधे आणि इंजेक्शनचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.
इंजेक्शन आणि औषधांचा पुरवठा हेट्रो ड्रग्ज, सिप्ला, झायडस, ज्युबीलंट फार्मा या कंपन्यांकडून पुणे आणि भिवंडी येथून होत आहे. औषध आणि इंजेक्शनबाबत गैरप्रकार रोखण्यासाठी संबंधितावर कारवाई करणार असल्याचेही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.
सोलापूर शहरात बलदवा डिस्ट्रीब्युटर, रुपाली एजन्सी, हुमा मेडिकल, युनायटेड एजन्सी, सन्मती मेडिकल, नागपार्वती मेडिकल आणि कोविड हॉस्पिटलमधील औषधी दुकानात पुरेशा प्रमाणात औषधे आणि इंजेक्शन उपलब्ध असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त नामदेव भालेराव यांनी सांगितले.
या इंजेक्शनच्या गैरप्रकाराबाबत काही माहिती असल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या 1800222365 या टोल फ्री क्रमांकावर देण्यात यावी, असे आवाहन श्री. भालेराव यांनी केले आहे.