सोलापूर, दि. १८ – राज्य शासनाने घेतलेल्या एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (युनिफाईड डिसिआर)च्या ऐतिहासिक निर्णयाची राज्यभरात प्रभावी अंमलबजावणी होत आहे. सोलापूर जिल्ह्यात याअंतर्गत ६३ बांधकामांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये एकूण ३९ इमारत बांधकामांना तर २४ इतर बांधकामांना मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
युनिफाईड डिसिआरच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मंत्री श्री शिंदे राज्यातील सर्व जिल्ह्यात स्वतः जाऊन बैठका घेत आहेत. १६ जानेवारी २०२१ ला मंत्री श्री शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यातील महापालिका, नगरपरिषद व नगरपंचायतींच्या विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी युनिफाईड डिसिआरबाबत सादरीकरण करण्यात आले. व या निर्णयाचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे निर्देश मंत्री श्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिले.
मंत्री शिंदे म्हणाले कि, सामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेऊन यूनिफाईड डीसीआरचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय राज्याच्या विकासात एकसूत्रीपणा आणून अर्थव्यवस्थेला चालना देणारा आहे. सोलापूर जिल्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींमधील अक्कलकोट मधील ४ इमारत बांधकामे, बार्शी मध्ये ८ बांधकामे, करमाळा मध्ये ९ बांधकामे, माढा मधील ३ इमारत बांधकामे, मंगळवेढा मध्ये ३ बांधकामे, मोहोळ मध्ये १४ इमारत बांधकामे, पंढरपूर मध्ये १५ इमारत बांधकामे, सांगोला मध्ये १ इमारत बांधकाम, कुर्डुवाडी मध्ये ४ बांधकामे व मैंदर्गी मधील २ इमारत बांधकामांना युनिफाईड डिसिआरच्या माध्यमातून परवानगी देण्यात आली आहे. मुंबई वगळता संपूर्ण राज्यात यूनिफाईड डीसीआरचा निर्णय लागू करण्यात आला आहे. स्ववापरासाठी १५० चौ. मीटरपर्यंत घर बांधकामासाठी परवानगीची अट काढून टाकण्यात आली असून १५० चौ मीटर ते ३०० चौ. मीटर पर्यंत बांधकाम परवानगीसाठी रीतसर अर्ज दाखल केल्यास १० दिवसांच्या आत परवानगी देणे बंधनकारक आहे. पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी बांधकामांसाठी ३ एफएसआय देण्यात आला असून कृषी पर्यटनात हॉटेल व फार्महाऊससाठी पूर्वी ०. १० टक्के असणाऱ्या एफएसआय मध्ये वाढ करून तो १ एफएसआय करण्यात आला आहे. युनिफाईड डिसिआरच्या क्रांतिकारी निर्णयामुळे राज्याचा समतोल विकास होणार असल्याचेही मंत्री श्री शिंदे यांनी सांगितले आहे.