दुधनी (गुरुशांत माशाळ): अक्कलकोट तालुक्यातील दुधनीहुन आंदेवाडी (जा) चिंचोळी (मैं),बोरोटी (बु),बोरोटी(खु), नागणसूर, हैद्रा, तोळनुरला जोडणाऱ्या जुन्या रस्त्याची अक्षरशः वाट लागली आहे. या रस्त्यावर ठीक – ठिकाणी मोठं – मोठे खड्डे पडले आहेत. या खड्डेमय रस्त्यावर वाहतूक करताना वाहन चालकांच्या नाकी नऊ येत आहेत. या खड्डेमय रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर व्हावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांतुन होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता खराब असून या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्षच करण्यात आली आहे. दुधनी, आंदेवाडी आणि इतर गावातील नागरिकांना या रस्त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर रोज अनेक वाहनांची वर्दळ असते. दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीला याच रस्त्यावरून शेतकऱ्यांची शेती माल ने-आण करावी लागते. मात्र खड्डेमय रस्त्यांमुळे वाहन चालकांची चांगलीच दमछाक होत आहे. दुधनी, आंदेवाडी, चिंचोळी, बबलाद आणि इतर गावातील शेतकऱ्यांची ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर याच रस्त्याने ये – जा करतात. खराब रस्त्यामुळे ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर पलटी झाल्याची घटना देखील घडले आहेत. विशेषतः जड वाहतुकीमुळे रस्ता खचला आहे. तसेच वाहन नादुरुस्त होऊन याचा आर्थिक फटका वाहनधारकांना बसत आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित लक्ष घालून या रस्त्याची दुरुस्ती करून वाहनधारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी दुधनी, आंदेवाडी (जा),बोरोटी (बुद्रुक), बोरोटी (खुर्द), बबलाद, चिंचोळी(मैं) आणि इतर गावांतील नागरिकांतुन होत आहे.
रस्त्यावर चालणे मुश्कील
बबलाद, बोरोटी, आंदेवाडी, चिंचोळीला जोडणारा रस्त्याची पूर्णपणे चाळण झाली आहे. या रस्त्यामुळे आम्हाला नाहक त्रास होत आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी.
-राजकुमार लकाबशेट्टी ,बबलाद