ध्यास विश्वसार्ह बातमीचा

२६/११ मुंबई हल्ल्याचा सुत्रधार लखवीला १५ वर्षाची शिक्षा

लाहोर: मुंबईत २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि लश्कर-ए-तोयबाचा कमांडर जकी उर रहमान लखवी याला पाकिस्तान कोर्टाने १५ वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. पाकिस्तानातील एका न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. झकी-उर-रेहमान लखवी याला दहशतवादी कारवायांसाठी फंडिंग करण्याच्या आरोपाखाली शनिवारी पाकिस्तानात अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आल्यावर आठवड्याभरातच त्याला शिक्षा सुनावण्यात आली आहे.

 

लखवी हा लश्कर-ए-तोयबाचा कमांडर असून त्याचे हाफिझ सईदनंतर दहशतवादी संघटनेत दुसऱ्या क्रमांकाचे स्थान आहे. लखवी मुंबई दहशतवादी हल्लाप्रकरणी २०१५ पासून जामिनावर आहे. त्याला पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी विभागाने (CTD) अटक केली आहे.

 

पंजाबच्या दहशतवाद विरोधी विभागाने गुप्त माहितीवर आधारित अभियानानंतर प्रतिबंधित संघटना लश्कर-ए-तोयबाचा दहशतवादी जकी उर रहमान लखवी याला दहशतवादी कारवायांसाठी वित्तपुरवठा करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याची माहिती पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दिली होती. त्यानंतर त्याला अज्ञात स्थळी नेण्यात आले होते.

मुंबईवर झालेल्या २६/११च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हा झकी-उर-रेहमान लखवी आहे. मुंबईवर झालेल्या या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकले होते. या हल्ल्यात १६६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. यानंतर मुंबई पोलीस आणि एसएसजी कमांडोजने केलेल्या कारवाईत नऊ दहशतवाद्यांचा खात्मा केला. तर कसाब या दहशतवादाला जिवंत पकडले होते. त्याने दिलेल्या जबानीमुळे हा हल्ला पाकिस्ताननेच केल्याचं सिद्ध झालं होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!