मुंबई, दि. ३१: कोरोना लसीकरणाचा ड्राय रन देशभर दि. २ जानेवारी रोजी होणार असून त्यासाठी महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज याबाबत घेतलेल्या व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लसीकरणासाठी कशाप्रकारे तयारी करायची याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
ड्राय रनसाठी एकाच जिल्ह्यातील तीन साईट (आरोग्य केंद्र) निवडण्यात आले आहेत. लसीकरणाच्या या ड्राय रनमध्ये निवडण्यात आलेल्या तीनही ठिकाणच्या प्रत्येकी २५ जणांना लसीकरणासाठी निवडण्यात येणार आहे. मात्र प्रत्यक्षात लस टोचण्यात येणार नाही मात्र त्यासाठी ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्याप्रमाणे सर्व तयारी केली जाणार आहे.
लसीकरणाच्या ठिकाणी वीज, इंटरनेट, सुरक्षा यासोबत प्रतिक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष असे तीन कक्ष केले जातील.
महाराष्ट्रातील पुणे येथील जिल्हा रुग्णालय औंध, प्राथमिक आरोग्य केंद्र मान, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील जिजामाता रुग्णालय, नागपूर जिल्ह्यातील डागा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय कामटी, नागपूर महापालिकेचे शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, जालना येथील जिल्हा रुग्णालय जालना, उप जिल्हा रुग्णालय अंबड, बदनापूर तालुक्यातील शेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नंदूरबार येथील जिल्हा रुग्णालय नंदूरबार, प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टे आणि नवापूर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी लसीकरणाचा ड्राय रन होणार आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.