ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सत्तेचा मुकुट शिवसेनेकडे मात्र विकास राष्ट्रवादीचा – प्रवीण दरेकर

सोलापूर – राज्यातील महाविकास आघाडी सरकारने विकासात राजकारण आणण्याचा प्रयत्न केला आहे. सरकार ही काही महाविकास आघाडीची खाजगी मालमत्ता नाही . तुम्ही काही सत्तेचा ताम्रपट घेवून आला नाहीत. लोकांच्या भावनेचा अनादर केला तर जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेल. महाविकास आघाडी म्हणजे आळवावरच पाणी आहे. ते अस्थिर आहेत. ते केवळ स्वबळाचे नारे देतात. हे सरकार कधी कोसळेल हे सांगता येत नाही. सत्तेचा मुकूट फक्त शिवसेनेकडे परंतु विकास राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा होत असल्याने कॉंग्रेसही नाराज असल्याचे मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केले.

अकलूज येथे माळवाडी-अकलुज ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत व नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत व्हावे या मागणीसाठी साखळी उपोषणास बसलेल्या तीन गावच्या ग्रामस्थांची भेट घेण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.

राज्य सरकारला मायबाप म्हटले जाते. जनतेला न्याय देण्याचे काम मायबाप सरकार करते. पण आज २४ दिवस झाले येथील जनता न्याय हक्कासाठी उपोषणाला बसली असून महाविकास आघाडी सरकारने त्यांची दखल घेतली नाही. राज्यात गेंड्यांच्या कातडीचे सरकार सत्तेवर आहे. त्यामुळे नगरपरिषद, नगरपंचायती जाहीर करण्यासारखे छोटेसे काम ही हे सरकार करु शकत नाही ही दुर्देवाची बाब असल्याचीही टीका दरेकर यांनी केली.

जर मागावून नगरपरिषद,नगरपंचायत दिली नाही तर हिसकावून घेवू. भाजपाच्यावतीने जिल्ह्यातील सर्व आमदार,खासदार या लढ्यात सहभागी होतील. मी मुख्यमंत्र्याकडे वेळ मागून दुजाभाव करु नका असे सांगतो. अकलूज,नातेपुतेकरांचा लढा वाया जाणार नाही. न्याय मिळवून देवू, गांधीवादी लढाई यशस्वी झाली नाही तर क्रांतीची लढाई लढू पण न्याय मिळवून देवू असेही दरेकर म्हणाले.

यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, आ. प्रशांत परिचारक, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, उपसरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, नंदिनीदेवी मोहिते पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, उपसभापती मामासाहेब पांढरे, अकलूज सरपंच पायल मोरे, उपसरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील, नातेपुतेच्या सरपंच कांचन लांडगे, उपसरपंच अतुल पाटील, माळेवाडी (अ) सरपंच जालींदर फुले, उपसरपंच अरुण खंडागळे, भाजप अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष मुक्तार कोरबु, ॲड रणजित भोसले, संजय गोरवे, नंदकुमार केंगार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!