ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भीमा – सीनेच्या पात्रात बंधारे निर्मीतीसाठी आराखडा करा – जलसंपदामंत्री

दक्षिण सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील भीमा आणि सीना नदीच्या पात्रात बंधारे बांधून ठिकठिकाणी पाणी अडवून ते शेतीसाठी वापरण्याकरीता आराखडा तयार करण्याचे निर्देश जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिले.

सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात जलसंपदामंत्री पाटील यांनी दक्षिण सोलापूर,मोहोळ,उत्तर सोलापूर तालुक्यातील पाणी नियोजन,वापर आणि सिंचन नियोजनासाठी बैठक आयोजित केली होती.

याप्रसंगी काँग्रेसचे नेते डाॅ.बसवराज बगले,  राष्ट्रवादीचे नेते प्रा.सुभाषचंद्र बिराजदार,  अप्पाराव कोरे, तालुका अध्यक्ष सुभाष पाटील, विलास लोकरे, निंगोडा तळे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

वडापूर पासून वरच्या भागात भीमेचे पाणी अडवून ते सिंचनासाठी वापरता येते. त्यासाठी वडापूर येथे 4 टी एम सी पाणी साठवण क्षमतेचे धरण होणे आवश्यक आहे. अशी मागणी यावेळी करण्यात आली. मात्र लवादाची मान्यता मिळत नसल्याने तांत्रिक अडचण येतेे. शिवाय कर्नाटक सरकारचा विरोध होतोय, अशी भूमिका अधिक्षक अभियंता साळे यांनी मांडली. त्यावर तोडगा काढण्यासाठी मोहोळ पासून दक्षिण सोलापूरच्या वडापूर पर्यंत चार मीटर ऊंचीचे अर्धा टी.एम.सी.  क्षमतेचे लहान बॅरेजेस बांधण्याचे ज्येष्ठ नेते राजन पाटील यांनी सुचविले.

पाणी तंटा लवादाची पाणी उपलब्धतेची तांत्रिक अडचण असल्यास नैसर्गिक पावसाचे पाणी नदीच्या पात्रातच अडविणे शक्य आहे,  अशी भूमिका बसवराज बगले यांनी मांडली. शिवाय कर्नाटक सरकारकडून सध्या बंधारे बांधण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

आ.संजय मामा शिंदे,मोहोळचे आ.यशवंत माने, जिल्हा अध्यक्ष बळीराम साठे, माजी आ.दिपक साळुंखे, यांनी दुजोरा दिला.  त्यानुसार टप्प्याटप्प्याने बॅरेज निर्मिती करून पाणी वाटप करण्याचे नियोजन करता येईल त्यासाठी आराखडा तयार करा अशी सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रशासनाला दिली.

● बडकबाळ येथे बॅरेज होणार

दरम्यान वडकबाळसह येथे सीना नदीच्या पात्रात पाणी साठविण्यासाठी चार बॅरेज बांधण्याची मागणी प्रा.सुभाषचंद्र बिराजदार आणि विलास लोकरे यांनी केली. त्यानुसार त्वरीत पाहणी करून अहवाल सादर करण्याची सूचनाही मंत्री पाटील यांनी केली. याशिवाय राष्ट्रीय महामार्गाच्या पुलाखाली पाणी अडवून साठवण्यासाठी राजमार्ग प्रधिकरणाकडे पाठपुरावा करण्याबाबत अधिक्षकांना सांगितले.

● भंडारकवठेचा बंधारा दुरूस्ती करा

भंडारकवठे येथे भीमा नदीवर 45 वर्षापूर्वी बांधलेल्या पूर नियंत्रक बंधारा खचला असून त्याची दुरूस्ती करून ऊंची वाढविण्याची मागणी सतत ग्रामपंचायतीने केली आहे. मात्र याकडे दूर्लक्ष होत आहे. मोठा महापूर आल्यास भंडारकवठेसह 10 गावांना पुराचा धोका होवू शकतो, याकडे डाॅ.बसवराज बगले आणि प्रथमेश पाटील याकडे लक्ष वेधले.

याबाबत तपासणी करून तात्काळ अहवाल देण्याबाबत अधिक्षक अभियंता साळे यांना लेखी आदेश दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!