सोलापूर, दि. 17-शिक्षण हा मूलभूत पाया असून चांगले शिक्षण घेऊन मुलांनी मोठी स्वप्ने बघत जीवनात पुढे जावे,असे आवाहन प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी केले.
शनिवारी, सोलापूर श्रमिक पत्रकार संघात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रातिनिधिक स्वरूपात पाच पत्रकारांच्या पाल्यांना प्रिसिजन कॅमशाफ्ट कंपनीच्यावतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यावेळी डॉ. शहा बोलत होत्या. याप्रसंगी प्रिसिजन कॅमशाफ्ट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक यतीन शहा यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
यावेळी डॉ. शहा यांनी प्रिसिजन फाउंडेशनच्या कार्याचा आढावा घेऊन फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.तसेच मुलांना शिक्षणाचे महत्वही पटवून सांगितले.
या कार्यक्रमास प्रिसिजन कंपनीचे जनसंपर्क अधिकारी आदित्य गाडगीळ यांच्यासह पत्रकार व त्यांचे पाल्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस समाधान वाघमोडे यांनी केले.व आभारही मानले.