अक्कलकोट, दि.२८ : सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे बदलत्या वातावरणाचा परिणाम मानवी आरोग्यावर होत असून तालुक्यात सर्दी, ताप, खोकला, डेंग्यू व पाण्यातील कावीळीने नागरिक बेजार झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर सतर्कतेचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. दिवसभर ढगाळ वातावरण, पहाटे सुटलेला गार वारा, अधूनमधून पावसाची रिपरिप, चिखलमय रस्ते, दलदलीत परिसर, वातावरणातील बदलांमुळे विषाणूंनी डोके वर काढले आहे. त्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील विविध गावांत सर्दी, ताप ,खोकला, डेंग्यू , पाण्यातील कावीळ, घसा दुखणे अशांनी नागरिक आजारी पडत आहेत. त्यामुळे दवाखाने गर्दी झाल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे.
यंदाच्या पावसाळ्यात सुरवातीपासून वरुणराजा प्रसन्न आहे. मृगाच्या पाठोपाठ सगळ्याच पावसाने समाधानकारक बरसात केल्याने सर्वत्र ओढे तलाव नद्या पाण्याचे डबके वाहत आहेत. ग्रामीण भागात सर्वत्र रस्ते चिखलमय व निसरडे झाले आहेत. जागोजागी पाण्याचे डबके साचले असून भर रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत आहेत. गावातील सांडपाण्याचे गटारी ओव्हरफ्लो होऊन रस्त्यावरून वाहत आहेत. त्यामुळेच विषाणूंची संख्या वाढल्याने साथीचे आजाराने डोकेवर काढले आहे.
सध्या लहान मुलांसह प्रौढ नागरिकांसुद्धा सर्दी, ताप,खोकला, डेंग्यू, पाण्यातील कावीळ, घसा दुखणे या आजाराचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने खाजगी दवाखान्यासह सरकारी दवाखान्यात गर्दी होत आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत तर संबधीत प्रशासन मात्र सुस्त आहे.
पावसामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे. सगळीकडे मच्छरांचा उन्माद वाढला आहे. डेंग्यू, पाण्यातील कावीळ, या सारख्या आजाराचे आक्रमण रोखण्यासाठी ठोस कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.