ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कारंबा ठरले उत्तर सोलापुरातील स्वच्छ, सुंदर गाव !  राज्य शासनाच्या (स्व) आर. आर. पाटील तालुकास्तरावरील पहिल्या पुरस्कारावर उमटवली मोहोर, स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण

सोलापूर : गेल्या तीन वर्षापासून विकासामध्ये सातत्य ठेवणारे आणि सतत नाविण्यापूर्ण उपक्रमामुळे लक्ष वेधणाऱया उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा ग्रामपंचायतीने यंदाच्या राज्य शासनाच्या (स्व.) आर.आर. पाटील स्वच्छ व सुंदर गाव स्पर्धेमध्ये तालुकास्तरावरील प्रथम क्रमांकाच्या पुरस्कारावर मोहोर उमटवत आपले वेगळेपण दाखवून दिले आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते रविवारी (ता.15) स्वातंत्र्यदिनी या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात रविवारी सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम होईल. तीन वर्षापूर्वी 2017 मध्ये ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा तीन पक्षाच्या ग्रामविकास आघाडीने बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. तसेच पहिल्यांदाच लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आलेल्या सौ. कौशल्या विनायक सुतार यांनी या तीन वर्षात आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवत गावाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला.

गावातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर आणि लोकसहभाग या जोरावर विविध योजना त्यांनी गावात राबवल्या. गावातंर्गत स्वच्छता, सिमेंट रस्ते, हायमास्ट, पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येक चौकात पाणी टाकी यासह गावातील आबालवृद्धासह महिला, तरुण, ज्येष्ठ मंडळी या प्रत्येकासाठी वैयक्तिक लाभाच्या योजना पुरवल्या. त्याशिवाय ग्रामपंचायतीचे कामकाज, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, व्यायामशाळा, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन आदींची तपासणी अधिकाऱयांच्या एका पथकाद्वारे कऱण्यात आली. या पुरस्कारासाठी शंभर गुणाच्या आधारे मुल्यांकन झाले. त्यातून अखेरीस तालुका स्तरावर कारंब्याला पहिला क्रमांक मिळाला.

दहा लाखाचा पुरस्कार

या स्पर्धेत उत्तर सोलापुरातून एकमेव कारंबा गावाची निवड झाली आहे. दहा लाख रुपये आणि सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे या पुरस्कार स्वरुप आहे.

“लोकसहभागामुळेच आम्ही हे काम करु शकलो, आमचे उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारीवर्ग या सर्वांच्या कष्टाचे, सहकार्याचे हे फळ आहे. यापुढेही गावच्या सर्वांगिण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.आता जिल्हा आणि राज्यस्तरावर आम्हाला पुरस्कार मिळवायचा आहे” – कौशल्या सुतार सरपंच, कारंबा

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!