ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दृश्य कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे; व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांची खंत

अक्कलकोट : संपूर्ण महाराष्ट्रात संगीताचे संस्कार आहेत.लेखनाचे वाचनाचे संस्कार झालेले आहेत पण दृश्य कलेकडे जाणूनबुजून दुर्लक्ष झाले आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक स्थिती उंचावण्यासाठी कलेकडे पाहणे आवश्यक आहे. पालकांनी आपल्या मुलांकडे त्यांच्यात दडलेल्या सुप्त कलागुणांकडे बारकाईने पाहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जेष्ठ व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांनी केले.

अक्कलकोट तालुक्यातील बादोले (बु) येथील के पी गायकवाड हायस्कूल येथे कार्टून धमाल कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष मल्लिनाथ बगले हे होते. तर व्यासपीठावर मुख्याध्यापक सुनील गुमास्ते, मुस्ताक शेख,वर्षा कुलकर्णी,अमोल फुलारी,अदिती कुलकर्णी उपस्थित होते.

पुढे बोलताना कुलकर्णी म्हणाले की, समाज आणि परिसर व शासनाच्या दुर्लक्षामुळे चित्रकला किंवा व्यंगचित्रकला याकडे उदासीनता आहे. कलेबाबत आपल्या देशात साक्षरता नाही. व्यंगचित्रात केरळ या राज्याने विकास साधला आहे.व्यंगचित्रात जिवंत भावना व भाष्य असतात.

व्यंगचित्रकार कुलकर्णी हे ४० वर्षाच्या कारकिर्दीत आजवर २० हजार व्यंगचित्र वृत्तपत्र व मासिकात प्रसिद्ध झाले आहेत.शाळेतल्या विद्यार्थ्यांना व्यंगचित्रातल्या क्लुप्त्या शिकवल्या व मार्गदर्शन केले. छंद हे माणसाला जगायला शिकवतात. छंदाशिवाय मनुष्यच नाही.

यावेळी महादेव सोनकर, कैलास गायकवाड, नागराज धर्मसाले, सूर्यकांत लवटे, भीम कोरे, सिद्धाराम वाकडे यांच्यासह प्रशालेतील विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मयूर दंतकाळे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!