ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट तालुक्यात पोषण अभियानाच्या दशसूत्री उपक्रमास प्रारंभ; सीईओ दिलीप स्वामी यांची नवी संकल्पना

मारुती बावडे

अक्कलकोट, दि.१ : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात  आलेल्या राष्ट्रीय पोषण अभियानाच्या ‘दशसूत्री’  या नाविन्यपूर्ण उपक्रमास अक्कलकोट तालुक्यात बुधवारी प्रारंभ झाला. या अभियानाला पहिल्याच दिवशी तालुक्यातील विविध अंगणवाडी केंद्रांमधून चांगला प्रतिसाद मिळाला.

३६८ अंगणवाड्या आणि १३० गावांमध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. देशातील कुपोषणाची समस्या पुर्णतः नष्ट करून देश सुपोषित व्हावा, यासाठी राष्ट्रीय पातळीवर हे मिशन राबवण्यात येत आहे. आजपासून सुरू झालेल्या या अभियानात राज्यातील महिला बालविकास विभागाचे कर्मचारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी सेविका यांचा समावेश असणार आहे. तसेच ग्रामपंचायती आणि स्थानिक स्तरावर देखील हे अभियान राबवण्यात येत आहे.

यासाठी कोरोनाचे सर्व नियम लक्षात घेऊन विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  रॅली, जनजागृती,  प्रचार, प्रसार, परसबागांचे महत्त्व आणि आरोग्याची पंचसुत्री सर्वदूर पोहोचवणे याचा समावेश यात राहणार आहे.

देशभरात प्रत्येक वर्षी सप्टेंबर महिना हा पोषण महिना म्हणून साजरा केला जातो. ज्यामध्ये पोषण आहार, आरोग्य, लसीकरण, स्तनपान इत्यादी बाबत विविध प्रकारचे कार्यक्रम घेऊन जनजागृती केली जाते. यामध्ये रॅली, पथनाट्य, वेबिनार, व्याख्यान , पोषण स्पर्धा, पाककृती स्पर्धा, रांगोळी स्पर्धा इत्यादी माध्यमातून पोषण बाबत जनजागृती केली जाते.

यावर्षी सुद्धा हे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. परंतु यावर्षी या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून पोषण अभियान ‘दशसूत्री’ याची जोड देण्यात आलेली आहे.

या दशसुत्रीमध्ये लसीकरण दिवस, जलपूर्ती दिवस, संवाद गरोदर मातांशी, विशेष
ग्रहभेटी कार्यक्रम, शोध घेऊया कुपोषित बालकांचा, चला करू या शाळेची पूर्वतयारी, माझ्या बालकांना नेमके हवे तरी काय?, वेबिनार दिवस, चर्चा यशोदा मातांशी,  पोषण जत्रा याचा समावेश आहे. अशाप्रकारची दशसूत्री संपूर्ण महिनाभर राबविली जाणार आहे.

★ नाविन्यपूर्ण उपक्रमास प्रतिसाद

दरवर्षीप्रमाणे यावर्षी हा उपक्रम साजरा करताना मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून नाविन्यपूर्ण दशसूत्री देखील राबविली जाणार आहे. कोरोना विषयक सर्व नियमांचे पालन करून अक्कलकोट तालुकावासियांनी पोषण माह कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा आणि या उपक्रमाला साथ द्यावी – बालाजी अल्लडवाड, बालविकास प्रकल्प अधिकारी, अक्कलकोट

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!