अक्कलकोट : कुरनूर धरणाच्या लाभक्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणातून पुन्हा पाणी सोडण्यात आले आहे. यात सध्या १ हजार ८०० क्यूसेक पाणी हे बोरी नदीच्या पात्रात सोडण्यात येत असून नदी काठच्या गावांना पुन्हा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पाण्याचा विसर्ग वाढविल्याने नदीपात्रत काठोकाठ भरून वाहत असून वरून पाण्याचे प्रमाण वाढल्यास आणखी यात वाढ करणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. चार दिवसापूर्वी धरणातून पहिल्यांदा पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर दोन दिवस पाणी सोडून विसर्ग कमी झाल्यानंतर बंद करण्यात आले होते.
पहिल्या टप्प्यात २१० आणि दुसऱ्या टप्प्यात ४५० क्युसेक याप्रमाणे पाणी सोडण्यात आले होते. परंतु पुन्हा रविवारपासून अचानक १ हजार ८०० क्यूसेक पाणी हे नदीत सोडले जात आहे. हे धरण अक्कलकोट तालुक्यात जरी असले तरी तालुक्यातील पावसावर यांचे भवितव्य अवलंबून नाही.
तुळजापूर आणि नळदुर्ग भागातील पावसावर धरणाचे चित्र अवलंबून आहे. सध्या त्या भागात जोरदार पाऊस असल्यामुळे धरण अजूनही ओव्हर फ्लो दिसत आहे. हरणा नदीतून विसर्ग सुरू आहे. पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रकाश बाबा यांच्यासह शाखा अभियंता मनलोर, माजी विभागप्रमुख नागनाथ उदंडे हे या सर्व स्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.
जसजसे पाण्याचा विसर्ग वाढेल त्या पद्धतीने पाणी खाली सोडण्यात येत आहे. कोणत्याही क्षणी पाणी वाढू शकते किंवा कमी होऊ शकते हे सांगता येणार नाही. परंतु नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी मात्र सदैव सतर्कता बाळगावी,असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.
तहसीलदारांकडून कार्यवाहीचे आदेश
अक्कलकोट, चपळगाव, किणी, वागदरी, दुधनी आणि मैंदर्गी या सर्वच मंडळ विभागात सतर्कतेचा इशारा तहसील कार्यालयाने दिला आहे. सततचा पाऊस असल्याने हरणा आणि बोरी नदी मधील प्रवाहात वाढ झाली असून पूर नियंत्रणासाठी धरणातून सध्या विसर्ग सुरू आहे. आणखी विसर्ग वाढवण्याची शक्यता आहे. यासाठी ग्राम स्तरावरील सर्व यंत्रणे मार्फत पुरप्रवण भागातील लोकवस्त्या व गावामध्ये तातडीने सतर्क राहण्याच्या सूचना द्याव्यात, तसेच वित्तहानी आणि जीवितहानी टाळण्यासाठी आवश्यक त्या कार्यवाही देखील तात्काळ करावी,असे आदेश तहसीलदार बाळासाहेब शिरसट यांनी दिले आहेत.