लोकमंगल’च्या शिक्षकरत्न पुरस्काराचे थाटात वितरण, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कसं जगावं याचे शिक्षण द्यावे : डॉ भांडारकर
सोलापूर : आजकाल इंटरनेटवर खूप काही वाचायला मिळते. मात्र ते ज्ञान नाही ती केवळ माहिती आहे. विद्यार्थ्यांना ज्ञान हे शिक्षकांकडूनच मिळते. वर्गात कोणतेही गणित विद्यार्थी सोडवतो मात्र आयुष्याच गणित सोडवण्यात तो अपयशी ठरतो. त्यामुळे शिक्षणासोबत कसं जगावं याचे ज्ञान सुद्धा शाळेतून मिळणे आवश्यक आणि ते काम शिक्षकांनी करावे, असे प्रतिपादन शिक्षण तज्ज्ञ डॉ. के. एम. भंडारकर यांनी केले.
लोकमंगल फाऊंडेशन आणि लोकमंगल सहकारी पतसंस्थेच्यावतीने आयोजित शिक्षररत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात ऑनलाईन व्याख्यानात ते बोलत होते. या पुरस्कार वितरण सोहळ्याला आ. सुभाष देशमुख, लोकमंगल फाऊंडेशनचे उपाध्यक्ष शहाजी पवार, डॉ. आशालता जगताप, डॉ. ह. ना. जगताप आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात नऊ शिक्षकांना शिक्षकरत्न पुरस्कार देण्यात आले तर एका शिक्षकाला डॉ. अब्दुल कलाम पुरस्कार देण्यात आला.
यावेळी आ. देशमुख म्हणाले, शिक्षक हे सोलापूर जिल्ह्याची ताकद आहेत. ते विद्यार्थी घडवण्यासोबतच जिल्ह्याचे चांगले मार्केटिंग सुद्धा करू शकतात. शिक्षकांनी सोलापूर जिल्ह्याचे वैभव वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. 27 सप्टेंबर हा पर्यटन दिन आहे. या निमित्ताने सर्व शिक्षकांनी सोलापूर जिल्ह्यातल्या पर्यटन स्थळांचे महत्व सर्वांना समजेल यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करावेत.
प्रास्ताविक डॉ. आशालता जगताप यांनी केले. पाहुण्याचा परिचय डॉ. ह. ना. जगताप यांनी करून दिला. सूत्रसंचालन अरविंद जोशी यांनी तर आभार प्रदर्शन युवराज गायकवाड यांनी केले.
यावेळभ पुरस्कार विजेत्या शिक्षकांच्या वतीने प्रा. विजय वडेर, मच्छिंद्रनाथ नागरे आणि वनिता जाधव तसेच नंदू माळी यांनी मनोगते व्यक्त केली.
पुरस्कार विजेते शिक्षक पुढीलप्रमाणेः
विलास काळे (अरण), रत्नमाला होरणे (कंदर), वनिता जाधव (शिवणे), अंबू गुळवे (सौंदरे), रामचंद्र जवंजाळ (तळे हिप्परगे), मच्छिंद्रनाथ नागरे (केम), विजय वडेर (सोलापूर), सावता घाडगे (अरण), सुप्रिया शिवगुंड (पिरळे) आणि तानाजी शिंदे (पंढरपूर).