मारुती बावडे
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील नागरिकांनी न चुकता मतदार यादीत नाव नोंदवावे यासाठी अक्कलकोट तहसीलकडून विशेष जागृतीपर अभियान राबविण्यात येत आहे. यंदा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय व बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समिती यांच्या वतीने गणेशोत्सवाच्या काळात “उत्सव गणेशाचा-जागर मताधिकाराचा’ या घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी दिली आहे.
या स्पर्धेची घाेषणा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी नुकतीच केली आहे. मताचा अधिकार हा १८ वर्षावरील नागरिकांचा कायदेशीर अधिकार आहे. त्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत नाेंदवणे आणि मताधिकार बजावणे आवश्यक आहे.
यासाठीच गणेश-मखराची सजावट, गणेश दर्शनासाठी घरी येणा-या भाविकांमध्ये यासंबंधीची जागरुकता करण्यासाठी अभिनव कल्पना राबवण्यात येत आहे. तसेच मताधिकार बजावताना जात, धर्म, पंथ निरेपेक्ष राहून आपला लाेकप्रतिनिधी निवडणे, पैसे किंवा इतर अमिषांना बळी न पडणे, मताधिकार बजावणे यासारख्या विषयांवर सजावटीतून जागृती करणे हाच उद्देश असल्याचे तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी सांगितले.
या स्पर्धेतील विजेत्या पहिल्या तीन क्रमांकाना अनुक्रमे राेख रक्कम २१ हजार , ११ हजार, पाच हजार रुपये देण्यात येणार आहे. या बराेबरच एक हजार रुपयांची दहा उत्तेजनार्थ पारिताेषिके ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेत सहभाग घेणा-या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी हाेऊ इच्छिणा-यांनी छायाचित्र व चित्रफित या गूगल अर्जावर भरुन पाठवावी असे आवाहन तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी केले आहे.
स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी अविराज मराठे ७३८५७६९३२८ किंवा प्रणव सलगरकर ८६६९०५८३२५ यांच्याशी संपर्क साधावा. १० ते १९ सप्टेंबर या कालावधीमधील आलेले साहित्यच स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.