अक्कलकोट,दि.१३ : आगामी नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर अक्कलकोट शहर एमआयएम पक्षाने पाणी प्रश्नाकडे सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. डिजिटल बोर्डवर खरमरीत टीका करत भाजपला टार्गेट केल्याची चर्चा नागरिकातून सुरू आहे.
सध्या अक्कलकोट नगरपालिकेवर भाजपची सत्ता आहे. काँग्रेस हा विरोधी पक्ष आहे. भाजपची एक हाती सत्ता असतानाही पाणी प्रश्न सोडवण्यात त्यांना अपयश आले आहे. तीन महिन्यावर अक्कलकोट नगरपालिकेची निवडणूक आहे.
यानिमित्ताने एमआयएमनेही तयारी सुरू केली आहे.अक्कलकोट शहराला होणारा पाणी पुरवठा हा कुरनूर धरणावर अवलंबुन आहे. सद्या कुरनूर धरण शंभर टक्के भरून ओवर फ्लो आहे. तरी पण अक्कलकोट शहराला आठ दिवसाआड पाणी पुरावठा होत आहे.
यामुळे शहरवासीयांतून संताप व्यक्त होत आहे. वर्षानुवर्षे चाललेले हा पाणीप्रश्न कधी संपणार ? असा सवाल एमआयएमने केला आहे.बस स्टँड आणि कारंजा चौक येथे लक्षवेधी दोन बॅनर लावले आहेत. त्याची चर्चा नागरिकांमध्ये सध्या सुरू आहे.