ध्यास विश्वसार्ह बातमीचा

हिळळी ते आंदेवाडी बुद्रुक ५ किलोमीटर रस्ता खराब, नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील हिळळी ते आंदेवाडी बुद्रुक  ( कुंभार वस्ती ) पाच किलोमीटर रस्ता अत्यंत खराब झाल्याने नागरिकांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात लोकप्रतिनिधींना निवेदनही देण्यात आले आहे, परंतु त्याची दखल न घेतली गेल्याने या भागातील नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.

हिळळी हे भीमा नदी काठचे गाव आहे. केवळ पाच किलोमीटरचा रस्ता असून रस्त्याची चाळण झाल्याने सार्वजनिक वाहतूक नेहमी बंद राहत आहे .त्यामुळे रुग्ण, ज्येष्ठ नागरिक व जनतेचे हाल होत आहेत. यापूर्वी अनेक वेळा निवेदन देऊन देखील केवळ सीमावर्ती भाग असल्याने दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सरपंच आप्पाशा शटगार यांनी केला आहे.

या रस्त्याची दुरुस्ती गेल्या दहा वर्षापासून केली गेली नाही. कित्येक वेळा भीमा नदीला पूर आल्याने रस्ता वाहून गेला तरीही त्याला निधी मिळाला नाही. या रस्त्याची दुरुस्ती करून हिळळी,आंदेवाडी बुद्रुक ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी केली जात आहे.

या रस्त्याच्या संदर्भात खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व अन्य अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे. याची दखल घ्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!