अक्कलकोट, दि.२२ : आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या स्वराज्य ध्वज यात्रेचे स्वागत अक्कलकोट शहरामध्ये बुधवारी सायंकाळी मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात स्वागत करण्यात आले. प्रारंभी हन्नूर नाका येथे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे आणि शहराध्यक्ष मनोज निकम व अन्य पदाधिकाऱ्यांनी या ध्वज प्रतिकृतीचे स्वागत केले.
यावेळी टाळ-मृदंग आणि भजनी मंडळाने सहभागी होत ही यात्रा लक्षवेधी बनवली. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली तरीही शेकडो कार्यकर्ते मोटार सायकलीवरून हन्नूर नाका येथून मल्लिकार्जुन मंदिर, बस स्टॅन्ड, कारंजा चौक, सेंट्रल चौक,फत्तेसिंह चौक मार्गे स्वामी समर्थ मंदिर येथे नेण्यात आली. तिथे मंदिरात जाऊन ध्वज पूजन करण्यात आले. त्यानंतर स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथेही मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले,सचिव श्याम मोरे
यांनी ध्वज यात्रेचे स्वागत केले. याठिकाणी प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
स्वराज्य ध्वज यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर १५ ऑक्टोबर रोजी भारतातील सर्वात उंच भगवा स्वराज्य ध्वज उभारला जाणार आहे. महाराष्ट्रासह देशातील विविध ७४ महत्त्वाच्या धार्मिक, अध्यात्मिक, गडकिल्ले, स्मारके, संतपीठ ,शौर्य पिठाच्या ठिकाणी त्याचे पूजन केले जात आहे. तीर्थक्षेत्र तसेच धार्मिक स्थळाच्या ठिकाणी ही यात्रा आता पोहोचली आहे.या पार्श्वभूमीवर अक्कलकोटच्या पुण्यनगरीत यात्रेचे जोरदार स्वागत झाले.ध्वज पूजनावेळी मंदिर समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस प्रकाश सुरवसे,युवानेते अविराज सिद्धे, कार्याध्यक्ष माणिक बिराजदार ,सरचिटणीस शंकर व्हनमाने,महिला तालुकाध्यक्ष माया जाधव, उपाध्यक्ष स्वामीनाथ चौगुले,युवक अध्यक्ष बंटी पाटील,महेश मोरे,महादेव वाले,संजय कोंडे,राम जाधव,आकाश कलशेट्टी, श्रीशैल चितली आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.