मराठी साहित्यकृतीत स्त्री व्यक्तिरेखांचे विविध प्रकारचे, विविध रंगाचे व परिपूर्ण चित्रण आले आहे. या साहित्य कृती स्त्रियांनी लिहिलेल्या असो की पुरुषांनी. त्यांनी त्या व्यक्तिरेखांचे प्रभावी दर्शन साहित्यातून घडवले आहे. त्यामुळे त्या साहित्यकृती अजरामर झाल्या आहेत.
‘मुंगी उडाली आकाशी’ मधील मुक्ताबाई, ‘आनंदी गोपाळ’ मधील डॉ. आनंदीबाई जोशी, ‘लंडनच्या आजीबाई’ मधील आजी, ‘नाच ग घुमा’, ‘आहे मनोहर तरी’ या आत्मकथनातील स्त्री व्यक्तिरेखांचे दर्शन मराठी साहित्य समृद्ध करतात. असे विचार डॉ. क्षमा वळसंगकर, (भूलजतज्ज्ञ) यांनी मसाप आयोजित बक्षीस वितरण कार्यक्रमात व्यक्त केले.
मसाप, शाखा सोलापूरच्यावतीने दोन वर्षापूर्वी महिलांसाठी लेखन स्पर्धा घेतली होती..या स्पर्धेचे बक्षीस वितरण कोरोनामुळे झाले नव्हते. या स्पर्धेचा विषय ‘मराठी साहित्य कृतीतील मला आवडलेली स्त्री व्यक्तिरेखा’ हा होता. या स्पर्धेत एकूण ३५ महिलांनी आपले लेख पाठवले होते. त्यात सौ. आशा पाटील यांना प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक सौ सुलेखा आराध्ये, डॉ.मीरा शेंडगे यांना विभागून देण्यात आला.
तृतीय क्रमांक मानसी वैद्य तर उत्तेजनार्थ मृणालिनी पंडित व ऋतुजा दिवाणजी यांना मिळाला आहे .या स्पर्धेच्या परीक्षक सौ. आरती काळे या होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मसापचे अध्यक्ष डॉ. सुहास पुजारी होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात साहित्यातील व्यक्तिरेखांविषयी विवेचन केले.
प्रा डॉ पुजारी यांनी सर्व स्पर्धकांचे अभिनंदन केले व ते म्हणाले, “मराठी साहित्यातील व्यक्तिरेखा संस्मरणीय अशा आहेत. त्या जीवनासंबंधी मार्गदर्शन करणाऱ्या आणि जगण्याचे नवे बळ देणाऱ्या आहेत. अशा व्यक्तिरेखांमधूनच एक प्रेरक शक्ती वाचकांना मिळते. एका अर्थाने आपल्या जीवनावर साहित्यकृतीतील या व्यक्तिरेखांचे ऋण असते.” असे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. श्रुती श्री. वडगबाळकर यांनी केले तर सूत्रसंचालन सौ वंदना कुलकर्णी यांनी केले.
श्री मारुती कटकधोंड यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमात मसापचे कार्यकारिणी सदस्य श्री किशोर चंडक यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास अत्यंत दुर्मिळ अशी नाणी भेट दिली. त्यानिमित्ताने त्यांचा सत्कार करण्यात आला..
या कार्यक्रमास मसापचे उपाध्यक्ष श्री दत्ता अण्णा सुरवसे, कार्यवाह श्री बाबुराव मैंदर्गिकर, श्री किशोर चंडक, अण्णासाहेब कोतली, श्री नरेंद्र काटीकर, डॉ. नसीम पठाण, फैयाज शेख, श्री राजेन्द्र भोसले, श्री नितीन वैद्य, डॉ. सतीश वळसंगकर, श्री दिलीप अत्रे, श्री संतोष पवार असे अनेक मान्यवर उपस्थित होते.