वन्यजीव सप्ताह विशेष ; अक्कलकोट तालुक्यात आढळला दुर्मिळ अल्बिनो सातभाई पक्षी, कुरनूर धरण परिसर बनले पक्षांचे माहेरघर
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.१ : वाईल्डलाईफ काँझर्वेशन असोसिएशन सोलापूर आणि वनविभाग सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पक्षी निरीक्षण कार्यक्रमात अचानक अल्बिनो सातभाई पक्षांचा थवा उडाल्याचे दुर्मिळ चित्र दिसून आले आहे.यामुळे कुरनूर धरण आणि परिसर हे पक्षांचे माहेरघर बनत चालले आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
राज्यात सर्वत्र वन्य जीव सप्ताहाला सुरूवात झाली आहे. यानिमित्ताने पक्षी निरीक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कुरनूर धरण परिसरात चपळगाव ते तीर्थच्या वाटेवरील झाडीझुडपीजवळ अचानक एक सातभाई पक्षांचा थवा उडत असताना पक्षी निरीक्षक शिवानंद हिरेमठ यांचे लक्ष गेल्यावर त्यामध्ये एक पांढऱ्या रंगाचा पक्षी दिसला. लगेच आपल्या सदस्यांना याबाबत कल्पना देऊन सातभाईच्या थव्यामध्ये एक अतिशय दुर्मिळ अल्बिनो पक्षी आहे, असे सांगितले.
सोबत असलेले सुरेश क्षीरसागर, सुशांत कुलकर्णी, शिवानी गोटे, मोनिका माने, निखिल माळवदे, अथर्व इनामदार व इतर सदस्यांनी या अल्बिनो सातभाई पक्ष्याचे निरीक्षण केले. सोलापूरच्या माळरानावर दुर्मिळ अश्या अल्बिनो प्रकारचे सातभाई पक्षी पहिल्यांदा दिसून आले. सातभाई पक्ष्याचे संपूर्ण शरीर तपकिरी मातकट रंगाचे असते पण अल्बिनो पक्षी हा पूर्ण पांढऱ्या रंगाचा दिसतो. त्याची शेपूट लांब सडक असून शेपटीची मधली पिसे सर्वात लांब असतात.
सातभाई नेहमी सातच्या संख्येत दिसतात असा समज आहे. मात्र हे पक्षी ८ ते १० च्या थव्यात साधारणतः दिसतात व थवे १८-२२ पक्षी इतके मोठे सुद्धा असू शकतात.जमिनीवरचे किडे,वाळव्या ,अळ्या,आणि गवताच्या बिया हा त्यांचा मुख्य आहार असतो. शिकारी पक्षी दिसल्यावर सातभाई आवाज काढून इतर पक्ष्यांना सावध करतात, धोक्याचा इशारा मिळताच जमिनीवरचे सर्व पक्षी ताबडतोब जवळच्या एखाद्या झाडावर किवा झुडपात दडून बसतात. अल्बीनिजम हा एक अनुवांशिक प्रकार असून पक्ष्यांच्या शरीरात मेलानीन या रंगद्रव्यांच्या अभावामुळे पांढरा रंग दिसतो.
अल्बिनो पक्ष्यांची पिसे कमकुवत असतात व अनेक अडचणींचा त्यांना सामना करावा लागतो. या कारणांमुळे अल्बिनो पक्षी फार काळ जगत नाही. याबाबत वनविभाग सोलापूरचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील आणि सहकारी यांना अल्बिनो सातभाई पक्ष्याबद्दल माहिती देऊन नोंद करण्यात आले आहे. वन्यजीव सप्ताहाच्या सुरवातीस दुर्मिळ असलेला पक्षी दिसल्याने सोलापूराच्या पर्यावरण प्रेमीमध्ये आनंदाचे वातावरण आहे.